Bhanushali Building collapse | दुर्लक्ष नाही, पण आम्ही लोकांना घरातून खेचून बाहेर काढू शकत नाही : महापौर
"धोकादायक इमारतींकडे महापालिका दुर्लक्ष करत नाही. मात्र, आम्ही लोकांना खेचून घरातून बाहेर काढू शकत नाहीत. त्यामुळे मालकांची किंवा प्राधिकरणाची ती जबाबदारी असते", अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली (Kishori Pednekar on Bhanushali Building collapse).
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराजवळ (Mumbai Building Collapse) फोर्ट भागातील भानुशाली इमारतीचा 40 टक्के भाग कोसळला (Kishori Pednekar on Bhanushali Building collapse). या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या दुर्घटनेला इमारतीचा मालक दोषी असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली (Kishori Pednekar on Bhanushali Building collapse).
“धोकादायक इमारतींकडे महापालिका दुर्लक्ष करत नाही. मात्र, आम्ही लोकांना खेचून घरातून बाहेर काढू शकत नाहीत. त्यामुळे मालकांची किंवा प्राधिकरणाची ती जबाबदारी असते”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“मला मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीचा एक मालक आहे. त्याला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. पण इमारतीचा मालक आणि रहिवासी यांच्यात याविषयी चर्चा झालेली नसेल. मालकाने याबाबत रहिवाशांना माहिती दिली पाहिजे होती. इमारतीचं काम करायला हवं होतं. मात्र, मालकाने चालढकलपणा केला”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
मुख्य बातमी : मुंबईत रहिवाशी इमारतीचा भाग कोसळला, तिघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं
“आता या दुर्घटनेनंतर नेमके किती जण अडकले आहेत ते कळत नाही. आताच एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे जे चालढकल करतात अशा मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा”, असं मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं.
“सगळ्याच प्राधिकरणाने एकत्र येऊन अशा मालकांवर कारवाई केली पाहिजे. आम्ही नोटीसा दिल्या. नवीन बांधकामासाठी परवानगीदेखील दिली. इमारतीच्या मालकाची डागडुज किंवा नव्याने बांधण्याची जबाबदारी आहे”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच तेदेखील घटनास्थली दाखल झाले. त्यांनीदेखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“जखम झाली आहे. त्यावर अगोदर औषधोपचार करुया. जखम कशी झाली, हा नंतरचा भाग आहे. चार लोकांना आतापर्यंत बाहेर काढले आहे. आणखी एक अडकल्याची माहिती मिळत आहे. बाजूच्या इमारतीमधील नागरिकही बाहेर काढण्यात येत आहेत. इमारतीतून बाहेर काढलेले नागरिक रस्त्यावर येणार नाहीत. कुणालाही रस्त्यावर सोडण्यात येणार नाही याची जबाबादारी सरकारची आहे. सरकार त्यापासून लांब जाणार नाही”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
“नोटीस दिल्यानंतरही काही लोकं ऐकत नाहीत. घर हे माणसाच्या आयुष्याची कमाई असते. त्या घराशी त्याचं एक ऋणानुबंध असतं. पण त्याला हे कळत नाही की, त्याच्या मृत्यूचं ते कारण ठरु शकतं. अशा प्रकरणांमध्ये मालकांना जबाबदार ठरवून पुनर्विकास कसा करता येईल, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन यावर लवकरच निर्णय घेऊ”, असंदेखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.