Omicron : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर BMC ॲलर्ट, अवघ्या 9 रुपयात अँटिजेन टेस्ट किट, अर्ध्या तासात अहवाल
कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) वेरियंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC) अॅलर्ट झाली आहे.
मुंबई: कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) वेरियंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC) ॲलर्ट झाली आहे. मुंबई महापालिकेनं ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरु केले आहेत. त्यापैकी एक म्हणजेच कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिका रॅपिड अँटिजन चाचण्यांचे 20 लाख (Rapid Antigen Test Kit) किट विकत घेणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेला एक किट 9 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. तर, रॅपिड अँटिजेन टेस्टमुळं व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे की नाही याची माहिती अर्ध्या तासात मिळणार आहे.
मुंबईत ओमिक्रॉनचे दोन रुग्ण चाचण्यांचे प्रमाण वाढवलं
दक्षिण आफ्रिका, युरोप या देशांमध्ये थैमान घालणाऱ्या ओमिक्रॉन वेरियंटचे आतापर्यंत केवळ दोन बाधित रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. तरीही खबरदारी म्हणून पालिकेने कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. यासाठी 20 लाख अँटीजन चाचण्यांचे कीट खरेदी केले जाणार आहे.
नऊ रुपयांमध्ये चाचणी
विशेष म्हणजे केवळ नऊ रुपयांमध्ये ही चाचणी होऊन अर्ध्या तासांमध्ये अहवाल हातात पडणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून लवकरच स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे. मुंबईतील दररोज 35 ते 40 हजार लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये सद्यस्थितीत सुमारे अडीशे बाधितांची नोंद होत आहे.
पाच ठेकेदारांचा प्रतिसाद
पालिकेने अँटीजन कीट खरेदी करण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेला पाच ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. किमान एका चाचणीसाठी नऊ रुपये दर ठेकेदाराने लावला आहे. स्पर्धा वाढल्याने कंपन्यांकडून कमी दर मिळाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गर्दीच्या ठिकाणी चाचण्या होणार
या खरेदीमध्ये सुरुवातीला पाच लाख रुपयांच्या 50 हजार कीट्स घेण्यात येणार आहेत. रेल्वे स्टेशन, मॉल, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके अशा ठिकाणी वेगाने चाचण्या करण्यासाठी या कीट्सचा फायदा होणार आहे. पालिकेच्या चाचणी केंद्रात अँटीजन चाचणी विनामूल्य केली जाते.
इतर बातम्या:
BMC | मनपा कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘आनापानसती’ प्रशिक्षणाचे आयोजन
BMC plan to by 20 lakh Rapid Antigen Test on the wake of Omicron variant of Corona