दिवसाला 25 हजार रुग्ण आले तर काय करणार?, बेडपासून औषधांपर्यंतचा मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लान तयार
राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रुग्णसंख्येला नियंत्रण घालण्यासाठी कंबर कसली आहे.
मुंबई: राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रुग्णसंख्येला नियंत्रण घालण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिका आयुक्तांनी तर दिवसाला 20 हजार रुग्ण सापडले तर लॉकडाऊनचं सुतोवाच केलं आहे. मात्र, दिवसाला 25 हजार रुग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठीचा महापालिकेने अॅक्शन प्लान तयार केला आहे.
मुंबईत दररोज 20 ते 30 टक्के रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. दिवसाला 25 हजार रुग्ण आले तरी पालिकेचा अॅक्शन प्लॅन तयार आहे. बेड, आरोग्य कर्मचारी-डॉक्टर्स, औषधे अशी सर्व प्रकारची तयारी महापालिकेने केली आहे.
असा आहे रुग्ण संख्येचा अंदाज
तसेच सध्या दररोज आढळणार्या रुग्णांमध्ये 89 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसून फक्त 5 टक्के बाधितांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. मात्र संभाव्य वाढीमुळे 10 टक्के रुग्णांना दाखल करावे लागले तरी 35 हजार बेडची सुविधा तैनात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आढळणार्या रुग्णांपैकी 5 टक्के बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. 25 हजार रुग्ण दिवसाला आढळले तर ही टक्केवारी दुप्पट होईल. म्हणजेच 10 टक्के रुग्ण दाखल होतील, असा महापालिकेचा अंदाज आहे.
ऑक्सिजनचा पुरेसा साठा
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाणही कमी आहे. केवळ 1 ते 2 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज भासत आहे. मुंबईच्या अंदाजित दिवसाच्या गरजेच्या तीन पट ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो. रुग्ण संख्येत वाढ होऊन ऑक्सिजनची गरज लागली तरी मुंबई महापालिकेकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे, असं पालिकेकडून सांगण्यात आलं.
खाजगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सेवा घेणार!
रुग्ण संख्येत वाढ झाली तर रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे म्हणून डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय आदी स्टाफ खाजगी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. मुंबईत कोरोना चाचण्यांच्या संख्येला वेग देण्यात येत असून रोज 60 हजार चाचण्या करण्यात येत आहेत. या संख्येत अधिक वाढ करण्यात येणार आहे.
1 लाख बेड्स अॅक्टीव्ह होतील
मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांपैकी 5 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे 82 टक्के बेड्स रिक्त असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली तर गरज पडल्यास खाटांची संख्या वाढवण्यात येणार असून 1 लाख बेड्स अॅक्टीव्ह होतील, असं पालिकेने सांगितलं.
संबंधित बातम्या:
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 2630 वर
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात 15 हजारापेक्षा अधिक रुग्ण, तिघांचा मृत्यू
Positivity अशीही! मुंबईत गेल्या महिनाभरात 3 हजार 516 मुलांना कोरोना, मृत्यू एकही नाही..!