मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार तुरुंगातून मिळवणार वकिलाची पदवी, अशी देणार परीक्षा
bombay high court: तुरुंग प्रशासनाच्या ईमेलवर १५ मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका पाठवली जाईल. त्यानंतर अन्सारी १२ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत ती प्रश्नपत्रिका सोडवू शकेल, असे मुंबई विद्यापीठतर्फे कोर्टात सांगण्यात आले.
मुंबई ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने हादरली होती. मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या लोकलमध्ये अवघ्या ११ मिनिटांत सात बॉम्बस्फोट झाले होते. त्या बॉम्बस्फोटात २०० लोक मृत्यूमुखी पडले होते. तसेच जवळपास ७०० जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार मोहम्मद साजिद मरगूब अन्सारी हा विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. त्याला तुरुंगातून पेपर देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली.
मुंबईतील ११ जुलै साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार मोहम्मद साजिद मरगूब अन्सारी याने उच्च न्यायालयात विधी अभ्यासक्रमाचा पेपर देण्यासंदर्भात अर्ज केला होता. त्यानंतर आता त्याचा विधी अभ्यासक्रमाचा राहिलेला पेपर १२ जून रोजी घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. नाशिक तुरुंगातूनच त्याला हा पेपर देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिली.
मे महिन्यात झाली होती परीक्षा
मोहम्मद साजिद अन्सारीला विशेष न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याने आतापर्यंत १७ वर्षांहून अधिक काळ कारावास भोगला आहे. त्याने कायद्याचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त करत सन २०१५मध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याला परवानगी दिली होती. त्यानंतर मागील वर्षी त्याने सिद्धार्थ कॉलेजमधून पहिल्या सत्राची परीक्षा दिली होती. यावर्षी ३ मे ते १५ मे या कालावधीत दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठीही त्याला उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने त्याला मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर नेले होते. परंतु त्या वेळी त्याचा एक पेपर राहिला. गुन्हेगारास त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत नेण्यासाठी 81,000 रुपये खर्च येतो.
ऑनलाईन परीक्षेचा विचार
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अन्सारीने अर्ज केल्यानंतर एक पेपर वगळता उर्वरित परीक्षा झाली. आता राहिलेला एक पेपर ऑनलाईन घेता येईल का, अशी विचारणा न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला केली होती. परंतु तो पर्याय उपलब्ध नव्हता. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने ‘तुरुंग प्रशासन व राज्य एटीएसच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार १२ जून रोजी आम्ही तुरुंगातच एक पर्यवेक्षक पाठवून अन्सारीची परीक्षा घेण्याची तयार मुंबई विद्यापीठाने दर्शवली.
पंधरा मिनिटांपूर्वी ईमेलवर प्रश्नपत्रिका
तुरुंग प्रशासनाच्या ईमेलवर १५ मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका पाठवली जाईल. त्यानंतर अन्सारी १२ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत ती प्रश्नपत्रिका सोडवू शकेल, असे मुंबई विद्यापीठतर्फे कोर्टात सांगण्यात आले.