घरकाम करणं कमीपणाचं वाटतंय?; चुकूनही मनात असा विचार आला असेल तर उच्च न्यायालयाचा हा निर्णय वाचाच
नोकरी धंदा करणाऱ्या दाम्पत्यांमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने खटके उडत असतात. त्यामुळे काही लोक आपसात मतभेद मिटवून टाकतात. तर कुणी कुटुंबीयांची मध्यस्थी घेतात. तर कुणी कोर्टात धाव घेतात. मुंबई उच्च न्यायालयात असंच एक प्रकरण आलं आहे.
मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : मुंबई उच्च न्यायालयात एका व्यक्तीने घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. पत्नीपासून आपल्याला वेगळं व्हायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर घटस्फोट देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. घटस्फोटासाठीचं कारणही या व्यक्तीने याचिकेत दिलं आहे. विशेष म्हणजे त्याने दिलेलं कारण जसं गंमतीशीर आहे, तसंच धक्कादायक आहे. मात्र, कोर्टाने या कारणाची गंभीरपणे दखल घेऊन त्यावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे आता कोणत्याही पुरुषाला आपल्या जबाबदारीपासून दूर जाता येणार नाहीये.
मुंबई उच्च न्यायालयात एका व्यक्तीने याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायामूर्ती नितीन साम्ब्रे आणि न्यायामूर्ती शर्मिला देशमुख यांच्या पीठाने सुनावणी केली. या व्यक्तीने एका कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. कौटुंबिक न्यायालयाने 2018 मध्ये या व्यक्तीची पत्नीपासून घटस्फोट मागण्याची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ती सारखं फोनवर बोलते
या जोडप्याने 2010मध्ये बिहारमध्ये लग्न केलं होतं. 2011मध्ये पुण्यात कोर्ट मॅरेजही केलं होतं. त्यानंतर त्यांना एक मुलही झालं होतं. मात्र, दोघांमध्ये नंतर खटके उडाले. त्यामुळे त्याने कोर्टात धाव घेतली. पत्नीकडून छळ होत असल्याचा आरोप त्याने याचिकेत केला होता. बायको नेहमी फोनवर तिच्या आईशी बोलत असते. घरातील काम करत नाही, असा आरोप त्याने याचिकेत केला होता. त्यावर त्याच्या पत्नीनेही आपलं म्हणणं कोर्टात मांडलं. मी कामावर जाते. ऑफिसमधून आल्यावर मला घरातील सर्व काम करण्याची जबरदस्ती केली जाते. जेव्हा मी कुटुंबातील लोकांशी फोनवर बोलते त्यावेळी माझ्याशी गैरवर्तन केलं जातं, असं सांगतानाच नवऱ्याने आपल्याला अनेकदा मारहाण केल्याचा आरोपही या महिलेने याचिकेत केला आहे.
फक्ती स्त्रीचीच जबाबदारी नाही
आधुनिक समाजात घरातील जबाबदारी पती आणि पत्नी या दोघांनाही समान पद्धतीने घ्यावी लागते. घरातील स्त्रीने घराची सर्व जबाबदारी उचलली पाहिजे या मानसिकतेत आता सकारात्मक बदल आणण्याची गरज आहे, असं मतही उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.
ही तर प्रतिगामी मानसिकता
यावर कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पुरुष आणि महिला दोघेही नोकरी करत असतील तर पत्नीनेच घरातील सर्व काम करावे ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. हे प्रतिगामी मानसिकतेचं लक्षण आहे. वैवाहिक संबंधानंतर जीवनसाथीला तिच्या आईवडिलांपासून वेगळं करता येणार नाही. लग्नानंतर तिने आईवडिलांसोबतचे संबंध तोडण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
म्हणून घटस्फोट देता येत नाही
एखादी व्यक्ती आईवडिलांच्या संपर्कात राहते याचा अर्थ तिचा दुसऱ्याला मानसिक त्रास देण्याचा इरादा आहे असं मानता येणार नाही. आमच्या विचारानुसार, आईवडिलांच्या संपर्कात राहणाऱ्या व्यक्तीला तसे करण्याची बंदी घालणे हाच पत्नीचा मानसिक छळ आहे. तिला त्रास देणं आहे. हे दाम्पत्य दहा वर्षापासून वेगळं राहत आहे. त्यामुळे दोघे पुन्हा एकत्र येण्याची शक्यताच नाही, असं माणून त्यांना घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.