लोकल प्रवाशांच्या वैद्यकीय मदतीला ब्रेक, मध्य रेल्वेने EMR ला ठोठावला जबर दंड
लोकलच्या प्रवासात जखमी झालेल्या प्रवाशांना पहील्या एक तासाच्या आत ( गोल्डन अवर ) उपचार मिळावेत म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने उपनगरीय रेल्वे स्ठानकांवर इमर्जन्सी मेडीकल रूमची ( EMR) स्थापना करण्याचे आदेश दिले होते. परंतू रात्रीचे त्यांना टाळे लागते.
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर रोजचा धकाधकीचा प्रवास करताना सरासरी आठ ते दहा प्रवाशांचा हकनाक बळी जात असतो. या रेल्वे प्रवाशांना गोल्डन अवर मध्ये तातडीचे उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या ( Mumbai High court ) आदेशाने रेल्वे स्थानकांवर आपात्कालिन वैद्यकीय कक्षांची ( EMR) निर्मिती झाली होती. या वैद्यकीय कक्षांमध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध असावा आणि ते 24 तास उघडे असावेत असा नियम आहे. परंतू अनेक वैद्यकीय कक्ष रात्री आठ नंतर बंद होत असल्याचे उघडकीस आले होते. आता पश्चिम रेल्वेने ( Western Railway ) अशा ईएमआरवर कारवाई केल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही ( Central Railway ) कारवाईचा बडगा उगारला आहे.
पश्चिम रेल्वेच्या कांदिवलीसह अनेक स्थानकातील इएमआर रात्री आठ ते सकाळी नऊ चक्क बंद असल्याचे आरटीआय कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी उघडकीस आणले होते. मध्य रेल्वेच्याही अनेक स्थानकातील इएमआरनी ( EMR) देखील वेळ न पाळता रात्रीचे टाळे लावले असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जर एखादा अपघात झाला तर प्रवाशाला तातडीचे उपचार न मिळता त्याचे काही बरेवाईट होण्याचा धोका असल्याने यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी माहीतीच्या अधिकारात मध्य रेल्वेकडून माहीती मागितली होती.
समीर झव्हेरी यांनी आपात्कालिन वैद्यकीय कक्ष रात्रीचे बंद असल्याची तक्रार 12 फेब्रुवारी 2023 रोजी ट्वीटरवरुन रेल्वे मंत्रालयाला केली होती. त्याची प्रत जोडत मध्य रेल्वेकडून माहीती मागितली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने या ईएमआरची झाडाझडती केली. त्यावेळी स्थानकाचे ईएमआर रात्री उघडी असतात का ? डॉक्टर आणि पॅरामेडीकल स्टाफची उपलब्धता आहे का ? अशी पाहणी करण्यात आली आणि बंद असलेल्या ईएमआरवर दंडात्मक कारवाई झाली.
अशी झाली दंडात्मक कारवाई
अॅनी फाऊंडेशन संचालित भायखळा, घाटकोपर, सायन, विक्रोळी, डोंबिवली आणि वाशीची ईएमआर 8 ते 9 एप्रिलच्या रात्री आठ वाजता पाहणी दरम्यान बंद आढळली अनेक ईएमआर रात्री दहा नंतर बंद आढळली. ही ईएमआर दिवसाचे चोवीस तास उघडी हवीत त्यामुळे हे रेल्वेशी केलेल्या कराराचे उल्लंघन आहे. सहा ईएमआरना प्रत्येकी पाच हजार असा 30 हजाराचा दंड केला आहे. तर पनवेल, कळवा आणि भांडूपचे ईएमआर प्रकरणात त्यांचे संचलन करणाऱ्या मॅजिकडील हेल्थ कंपनीला 15 हजाराचा दंड सुनावला आहे. तर गोवंडीचे ईएमआर बंद असल्याचे आढळल्याने कंपनी जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टला पाच हजाराचा दंड सुनावला आहे.
मध्य रेल्वेच्या या स्थानकात वैद्यकीय कक्ष
सध्या भायखळा, दादर, कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, वाशी, पनवेल, सायन, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, ठाणे, कळवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, टिटवाळा आणि कर्जत या स्थानकांवर ईएमआर आहेत.