BrijBhushan Singh : Ak 47 च्या पहिल्या एनकाऊंटरमध्ये बृजभूषणांचं नाव, दाऊदच्या साथीरांना लपवल्याचाही आरोप, राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी
राज ठाकरे यांना एवढं कडवट आव्हान देणारा हा खासदार आहे तरी नेमका कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? त्याचा राजकीय इतिहास काय? याचा शोध सुरू झाला. त्यात समोर जी माहिती आली. ती वाचल्यावर तुम्हीही कपाळावर हात माराल. कारण या बृजभूषण सिंह यांचा राजकीय इतिहास हा मुंबईतील गँगवॉरपासून ते तिहार जेलची हवा आणि त्यानंतर खासदारकीची खुर्ची असा आहे.
मुंबई : राज ठाकरेंचा (Raj Thackeray) अयोध्याचा दौरा (Ayodhya Visit) जाहीर झाला. या दौऱ्याची तारीख ठरली. मात्र या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून भाजपच्या एका एका खासदारानं दंड थोपटत आव्हान दिलं. राज ठाकरेंना अयोध्यात पाय ठेवू देणार नाही. त्यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी असा हट्ट धरून भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) बसले आहेत. त्या बृजभूषण सिंह यांनी काल-परवाच उत्तर प्रदेशात रॅली काढत, सभा घेत राज ठाकरेंविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं. त्यानंतर शरद पवारांचं तोंडभरून कौतुकही केलं. भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांनी मात्र आपला हट्ट सोडलाच नाही. राज ठाकरेंचं नाव घेतल्यावर महाराष्ट्रात अनेकांना आठवतं ते फक्त खळ्ळखट्याक आणि धडाडीची तडाखेबाज भाषण. अशा राज ठाकरे यांना एवढं कडवट आव्हान देणारा हा खासदार आहे तरी नेमका कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? त्याचा राजकीय इतिहास काय? याचा शोध सुरू झाला.
बृजभूषण यांचं मुंबई कनेक्शन काय?
यात समोर जी माहिती आली. ती वाचल्यावर तुम्हीही कपाळावर हात माराल. कारण या बृजभूषण सिंह यांचा राजकीय इतिहास हा मुंबईतील गँगवॉरपासून ते तिहार जेलची हवा आणि त्यानंतर खासदारकीची खुर्ची असा आहे. बृजभूषण सिंह हे तर उत्तर प्रदेशातील खासदार आहे. मग त्यांचा आणि मुंबईचा काय संबंध असाही सवाल तुमच्या मनात असेल. तर त्याचंही उत्तर आम्ही शोधलंय. बृजभूषण सिंह यांचं नवा थेट दाऊद गँगशीही जोडलं गेलं होतं.
दाऊदशीही नाव जोडलं गेलं
कारण बृजभूषण त्यांच्यावर दाऊदच्या लोकांना लवपल्याचा आरोप होता. मुंबईतल्या पहिल्या AK 47 चा वापर करून जे गँगवॉर झालं. जी फायरिंग झाली ती दाऊदच्या लोकांकडून झाली होती. ते लोक मुंबईत गुन्हा करून उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे सांगितले जाते. मुंबईतील अरुण गवळी गँगच्या लोकांवर गोळ्या झाडून उत्तर प्रदेशात पळालेल्या दाऊदच्या माणसांना लवल्याचा आरोप बृजभूषण सिंह यांच्यावर झाला होता.
बृजभूषण यांच्यावर टाडाही लागला होता
भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर एकदा टाडाही लागला होता. त्यासाठी त्यांना तिहार जेलची हवाही खावी लागली होती. मुंबईत अरूण गवळीच्या भावाची हत्या झाल्यानंतर गवळी गँगकडून थेट दाऊदच्या मेहुण्याला म्हणजे हसीना पारकरच्या नवऱ्यालाच उडवण्यात आले. त्यानंतर दाऊदच्या लोकांनी गवळीच्या लोकांना मारण्याची सुपारी उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांना दिली. त्यात उत्तर प्रदेशातील गँगस्टर ब्रिजेश सिंह यांचं नाव पुढे आलं. त्याच ब्रिजेश सिंहला लवल्याचा आरोप हा बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आला. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचं प्रकरण हे टाडा लागल्याने सीबीआयकडे गेलं. मात्र या प्रकरणात त्यांना क्लिन चिट मिळाली. आणि बृजभूषण सिंह पुन्हा राजकारणात पाय जमवत जोमाने मैदानात उतरले.
राज ठाकरेंची भूमिका काय सांगते?
आता हे बृजभूषण सिंह हे राज ठाकरेंविरोधात रोज प्रतिक्रिया देत आहेत. मात्र मनसेकडून यावर अजून कोणीही काहीही बोललं नाही. तसेच माझ्या अयोध्या दौऱ्यावर मी बोलेन बाकी कुणी बोलू नये असे राज ठाकरे यांनीच सांगितल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे नेहमी खळ्ळखट्याक करणाऱ्या मनसेचा हा संयम काय सांगतो? राज ठाकरेंच्या या भूमिकेतून नेमके काय संकेत मिळतात? आणि हा दौरा नेमका कसा होणार? या राजकीय प्रश्नांची उत्तरं आगामी काळातील राजकीय समीकरणचं देतील.