उद्योगपती अदानी अचानक शरद पवार यांच्या भेटीला, तासभर चर्चा; ‘त्या’ प्रकल्पासाठी लॉबिंग?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी काल भेट घेतली. काल संध्याकाळी 9 च्या सुमारास शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाही. मात्र, पवार आणि अदानी यांची अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 29 डिसेंबर 2023 : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी काल रात्री अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल तासभर या दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीत धारावी पुनर्वसन प्रकल्पावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. धारावी प्रकल्प मार्गी लागावा म्हणून अदानी लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बॅकफूटवर येणार की अदानी विरोधातील संघर्ष कायम ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, अदानी आणि शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसातील भेटीगाठी वाढत असल्याने या भेटीवर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काल अमरावतीच्या दौऱ्यावर होते. पवार दिवसभर दौऱ्यावर होते. मात्र, अदानी भेटायला येणार असल्याने शरद पवार यांनी तातडीने मुंबई गाठली. उद्योगपती गौतम अदानी यांनी रात्री 9 च्या सुमारास सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. भेटीमागचं नेमकं कारण समजलं नाही. मात्र, या तासाभराच्या भेटीत अदानी यांनी शरद पवार यांच्यासोबत धारावी पुनर्वसन प्रकल्पाची चर्चा केल्याची सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अदानी यांच्यात शरद पवार हे धारावी प्रकल्पासाठी मध्यस्थी करणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
शरद पवार आणि अदानी यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अदानी आणि शरद पवार यांची भेट झाली तर त्याचा महाविकास आघाडीशी काय संबंध? अदानी हा काय कळीचा मुद्दा नाही. धारावी प्रकल्पाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याला आमचा विरोध आहे. कोण कोणाला भेटतंय यावर महाविकास आघाडीचं भविष्य अवलंबून नाही, असं सांगतानाच शरद पवार आणि अदानी यांचे फार जुने संबंध आहेत. त्यामुळे ते भेटले असतील, अशी सावध प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांचा मोर्चा
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी धारावी प्रकल्पाच्या विरोधात अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. स्वत: उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. अदानीला धारावीचा प्रकल्प दिला. पण झोपडीवासियांना मिळणार काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. स्थानिकांना 500 स्क्वेअर फुटाचं घर द्यावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी करतानाच टीडीआरच्या मक्तेदारीवरूनही सरकारला घेरलं होतं.
धारावी प्रकल्पाबाबतची माहिती
2004 पासून धारावीचा पुनर्विकास रखडलेला आहे
400 स्क्वेअर फुटाचं घर मिळावं अशी स्थानिकांची मागणी
ठाकरे गटाची 500 स्क्वेअर फुटाच्या घराची मागणी
प्रत्येक घरात रोजगार आहेत. त्याचंही पुनर्वसन हवंय
धारावीत 57 हजार पात्र घरे आहेत. आता सरकारकडून नव्याने सर्व्हे केला जाणार आहे
उद्धव ठाकरे यांनी 50 टक्के TDR ची मागणी केली होती. मात्र सरकारने 40 टक्के TDR दिला
धारावीत 10 लाखाहून अधिक लोक राहतात.