जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम म्हणत आम्हाला मतदान करा; उद्धव ठाकरे यांचं आवाहन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदान केल्यास मध्यप्रदेशातील जनतेला रामलल्लाचं दर्शन मोफत घडवून आणून देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. आम्ही हिंदुत्वाचा नारा दिला म्हणून आमच्यावर कारवाई करणाऱ्या निवडणूक आयोगाने आता आचारसंहितेत किंवा निवडणूक आयोगाच्या नियमावलीत काही बदल केले आहेत का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मतं मिळवण्यासाठी रामलल्लाचं मोफत दर्शन देणार असल्याची घोषणा करतात. त्यावर निवडणूक आयोग काहीच करत नाही. मग आम्हीही जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरयाचा नारा देऊन आम्हाला मतदान करण्याचं आवाहन करतो, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लगावला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा टोला लगावला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवल्याचंही सांगितलं.
क्रिकेटमध्ये जसे काही नियम असतात तशी निवडणुकीतही आचारसंहिता असते. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यात काही शंकाकुशंकांचा खुलासा विचारला आहे. भाजप सत्तेवर आहे म्हणून त्यांना फ्रि हीट द्यायची आणि आमची हिट विकेट काढायची. याला मोकळ्या वातावरणातील निवडणुका म्हणता येत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तेव्हा आमच्यावर कारवाई
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनेच देशात पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी या निवडणुकीचा किस्सा सांगतानाच त्यानंतर काय घडलं याची माहितीही दिली. देशातील पहिली निवडणूक आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढलो आणि जिंकलो. नंतर भाजप आमच्यासोबत आला. त्या निवडणुकीनंतर 1995मध्ये राज्यात आमचं सरकार आलं. तोपर्यंत आमचे पाच ते सहा आमदार बाद ठरवले गेले.
धक्कादायक गोष्ट म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढलो म्हणून सहा वर्षासाठी आमचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता. त्यावेळी हिंदुत्वाबद्दल बोलायला कोणी कचरत नव्हतं. गर्व से कहो हा नारा विश्व हिंदू परिषदेने दिला असेल पण शिवसेना प्रमुखांनी ते नारा बुलंद केला. आम्ही हिंदुत्वाचा नारा दिला तेव्हा आमच्यावर कारवाई केली. मतदानाचा अधिकार काढला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्वांनाच मोफत दर्शन द्या
आम्ही हिंदुत्वाचा नारा दिला म्हणून आमच्यावर कारवाई करणाऱ्या निवडणूक आयोगाने आता आचारसंहितेत किंवा निवडणूक आयोगाच्या नियमावलीत काही बदल केले आहेत का? केले असतील तर हरकत नाही. पण नियम सर्वांना समान असावेत आणि आम्हाला कळायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकाच्या निवडणुकीत बजरंग बली की जय म्हटले. काल अमित शाह यांनी मध्य प्रदेशात भाजपला निवडून दिलं तफ्रि अयोध्या दर्शन देऊ असं जाहीर केलं.
आमचं शाह यांना म्हणणं आहे की, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात तुम्ही फक्त मध्यप्रदेशाच्या मतदारांना रामलल्लाचं दर्शन मोफत देऊ नका. तर देशातील सर्व राम भक्त जनतेला मोफत अयोध्यावारी घडवून आणा. अगदी मणिपूर किंवा जम्मू काश्मीरच्याही लोकांना अयोध्येतील रामलल्लाचं दर्शन मोफत घडवून आणा, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.