मुंबई : दोन वर्षानंतर दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआयनं अहवास दिलाय. त्या अहवालांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर उपस्थित केलेल्या दाव्यांवर प्रश्न उभे राहिले आहेत. म्हणून ठाकरे गट आता राणे पिता-पुत्रांकडून माफीची मागणी करतोय. ज्या दिशा सालियावरुन राणे कुटुंबियांनी ठाकरेंना टार्गेट केलं होतं, त्या दाव्यांना सीबीआच्या रिपोर्टनं खोटं ठरवलंय. बलात्कारानंतर दिशा सालियानची हत्या झाल्याचा दावा राणेंनी अनेकदा केला होता. या साऱ्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा गंभीर आरोपही राणेंचा होता. मात्र दिशा सालियानचा मृत्यू दारुच्या नशेत इमारतीवरुन तोल गेल्यामुळे झाला, असं सीबीआयनं अहवालात नमूद केलंय.
नारायण राणेंचा दुसरा आरोप होता की दिशा सालिया आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचं एकमेकांशी कनेक्शन होतं. मात्र सीबीआयच्या अहवालात तशी शक्यता देखील नाकारण्यात आलीय. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणेंनी याआधी जे आरोप केले होते, त्यावरुन ठाकरे गट आक्रमक झालाय.
महाराष्ट्रात सरकार बदलानंतर दिशा सालियानचे खरे आरोपी तुरुंगात जाणार, असा इशारा नारायण राणेंनी दिला होता. मात्र आता सीबीआयनंच दिशा सालियानचा मृत्यू तोल गेल्यामुळे झाल्याचा अहवाल दिलाय. त्यावर आधीच्या सरकारनंच पुरावे नष्ट केले असावेत, असं नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे म्हणतायत.
दिशा सालियान ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतसिह राजपूत वांद्रेत तर दिशा सालियान मालाडमध्ये राहायची. 8 जून 2020 ला दिशा सालियानचा इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. त्याच्या बरोब्बर 6 दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 ला सुशांतसिंह राजपूतचाही मृत्यू झाला.
त्यामुळे या दोन्ही मृत्यूंमध्ये काहीतरी तार असल्याचा संशय वर्तवला गेला. त्याकाळी पोलिसांनी दिशा सालियानच्या मृत्यूला आत्महत्या ठरवलं होतं. मात्र आता सीबीआयनं दिशा सालियानच्या मृत्यूला अपघात ठरवलंय.
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयचा तपास अद्यापही सुरु आहे. आरोपांनुसार दिशा सालियानचा ज्यादिवशी मृत्यू झाला, त्यादिवशी तिच्या घरी पार्टीचं आयोजन होतं. त्याचदिवशी दिशा सालियानचा मृत्यू झाला. त्यामुळे इमारतीतलं सीसीटीव्ही, सोसायटीतली रजिस्टर वही
गायब कशी झाली? यावर राणेंचं अद्यापही प्रश्नचिन्हं आहे.