Mumbai Local : तुमची लोकल कुठपर्यंत आलीय? आता थेट लोकलचे लोकेशन ट्रॅक करता येणार
Mumbai Local : वापरकर्त्याला ट्रेनच्या आगमनाबाबत वेळेवर सूचना देखील मिळतील. ही सुविधा मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर लाईन आणि बेलापूर/नेरुळ - खारकोपर लाईनवरील गाड्यांच्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.
मुंबई: अनेकदा प्रवाशांना लोकल प्लॅटफॉर्मवर कधी येणार हे माहीत असतं. पण ती लोकल (Mumbai Local) कुठपर्यंत आली हे माहीत नसतं. म्हणजे लोकलचे लोकेशन कळत नाही. त्यामुळे अनेकदा प्रवाशांची तारांबळ उडते. ट्रेन लेट झाली की ती कधीपर्यंत स्टेशनवर येणार हे समजत नाही. त्यात नाहक वेळ जातो. मात्र, आता असे होणार नाही. आता प्रत्येक प्रवाशांना लोकलचं लोकेशनही ट्रॅक (Track Live Location) करता येणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता यात्री मोबाइल ॲप्लिकेशनवर मध्य रेल्वेतील लोकल ट्रेनच्या थेट लोकेशनची माहिती मिळू मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत काल यात्री ॲपच्या (Yatri App) या वैशिष्ट्याचे प्रात्यक्षिक पार पडले. शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, श्रीमती इती पांडे, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी सेवा), मध्य रेल्वे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यात्री ॲप दैनंदिन उपनगरीय प्रवाशांसाठी रेल्वे धावण्याविषयीची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन आहे. विशेषत: इतर कोणत्याही कारणांमुळे किंवा मेगाब्लॉक इत्यादींमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याच्या काळात ट्रेन रद्द करणे किंवा विशेष गाड्या चालवल्याबद्दल त्यांना माहिती मिळू शकते, असं महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितलं.
कसा कराल वापर?
‘यात्री’ हे एक मोबाइल ॲप्लिकेशन आहे जे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आणि सुलभ प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यात मदत करेल. सर्व उपनगरीय रेकवर स्थापित जीपीएस उपकरणे आणि लोकल ट्रेनचे रिअल टाइम लोकेशन मिळवण्यासाठी विकसित केलेला अल्गोरिदम वापरकर्त्यांना नकाशावर थेट ट्रेनचे स्थान पाहण्यास आणि ट्रेनचे चिन्ह हलताना पाहण्यास सक्षम करेल. डेटा दर 15 सेकंदांनी ऑटो रिफ्रेश होतो आणि ट्रेनचे अपडेट केलेले लाईव्ह लोकेशन मिळवण्यासाठी वापरकर्ते रिफ्रेश बटणावर क्लिक करू शकतात. वापरकर्त्याला ट्रेनच्या आगमनाबाबत वेळेवर सूचना देखील मिळतील. ही सुविधा मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर लाईन आणि बेलापूर/नेरुळ – खारकोपर लाईनवरील गाड्यांच्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.
यात्री ॲपची इतर वैशिष्ट्ये
- थेट अपडेट
- लोकल ट्रेन्सचे अपडेट केलेले वेळापत्रक,
- उपनगरीय गाड्यांचे तिकीट भाडे तपशील,
- स्त्रोत आणि गंतव्य स्थानके प्रविष्ट करून प्रवासाचे नियोजन,
- मेल एक्सप्रेस ट्रेनची माहिती जसे की “स्पॉट तुमची ट्रेन” आणि “पीएनआर स्थिती”
- मुंबई विभाग, मध्य रेल्वेवरील स्थानकांवर स्थानकनिहाय सुविधा पाहणे,
- रेल्वे आणि वैद्यकीय आपत्कालीन क्रमांक
- आवडत्या (नियमित) गाड्या आणि मार्गांवर अलर्ट सेट करणे,
- एका टॅपमध्ये SOS साठी रेल्वे आपत्कालीन स्थितीशी संपर्क साधणे,
- मेट्रो, मोनो, फेरी आणि बस माहिती आणि वेळापत्रक,
- वापरकर्ते अभिप्राय आणि सूचना
- ‘यात्री ॲप’ अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध