पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची तर विरोधकांना कुणाची चिंता?, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं
विरोधक पाटण्याला एकत्र येत आहेत. तिथं ते त्यांच्या मुलाबाळांची चिंता करतात. त्यासाठी एकत्रिकरण सुरू आहे. सोनिया गांधी यांना विरोधकांना एकत्र करून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं आहे.
मुंबई : पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात १५ पक्षांची महाबैठक पाटणा येथे आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची चिंता आहे. तर विरोधकांना मात्र स्वतःच्या मुलाबाळांची चिंता आहे. अशा शब्दात विरोधकांच्या बैठकीवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ट्वीट करत ही जोरदार टीका केली. सोनिया गांधी यांना राहुल गांधी तर शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता, तर उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांच्या भविष्याची चिंता लागली आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केलाय.
या तिघांची मोठ्या नेत्यांना चिंता
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विरोधक पाटण्याला एकत्र येत आहेत. तिथं ते त्यांच्या मुलाबाळांची चिंता करतात. त्यासाठी एकत्रिकरण सुरू आहे. सोनिया गांधी यांना विरोधकांना एकत्र करून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना समोर करायचं आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांची चिंता आहे. विरोधकांनी एकत्रित मूठ बांधली तरी देशाची जनता ओळखून आहे. २०१४ ला हेच झालं. २०१९ ला मूठ बांधली होते. विरोधक एकत्रित आले होते. काही झालं नाही.
…तरी काहीही फरक पडणार नाही
तर, विरोधक कितीही मूठ बांधतील तरी काहीही फरक पडणार नाही, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हंटलं. जनता भाजप आणि सहयोगी पक्षांच्या पाठीशी उभी राहणार, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. अशाप्रकारची बैठक मागच्या वेळीसुद्धा झाली होती. ५२ नेते आणि २० पक्ष एकत्र आले होते. आणाभाका घेतल्या होत्या. देश पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात पुढं गेलाय. त्यामुळे अशा कितीही मुठा बांधल्या तरी काहीही फरक पडत नाही. या देशातील जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी उभी आहे. कितीही पक्ष एकत्र आले, तरी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पार्टीलाच देशातील जनता सहकार्य देईल, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलाय.
तेव्हा झाला हा घोटाळा
चौकशांना घाबरून अवैध पैसे सरकार पकडेल. अशी विरोधकांना भीती आहे. पण, यातून कुणीही सुटणार नाही. सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता अशी मुंबई मनपाची अवस्था आहे. काम न करता पैसे उचलण्यात आले. तक्रारीची चौकशी झाली पाहिजे. कमिशनर यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना घोटाळा केला, हे सर्व बाहेर आलं पाहिजे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं.