बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळचे रॉड तोडले, महिलांना धक्काबुक्की, शिवसैनिक एकमेकांना भिडले

| Updated on: Nov 16, 2023 | 9:31 PM

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केल. त्यानंतर स्मृती स्थळावर एकच गोंधळ सुरू झाला. शिवसैनिक एकमेकांना भिडले. शाब्दिक चकमकी सुरू झाल्या. धक्काबुक्कीही करण्यात आली. त्यामुळे या परिसरात एकच तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी वेळीच येऊन हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे.

बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळचे रॉड तोडले, महिलांना धक्काबुक्की, शिवसैनिक एकमेकांना भिडले
balasaheb thackeray smruti sthal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निवृत्ती बाबर, दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे. मात्र, त्यापूर्वीच शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात भिडले. ज्या ठिकाणी बाळासाहेबांना अग्नी देण्यात आला आणि ज्या ठिकाणी बाळासाहेबांचा स्मृती चौथरा उभारण्यात आला, तिथेच शिवसैनिक एकमेकांविरोधात भिडले. शिवसैनिकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. धक्काबुक्की केली. यावेळी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळचे रॉड पडले. बॅरिकेड्सही पडल्या. पोलिसांनी शिवसैनिकांना हटवण्याचा प्रयत्न केला. पण कुणीच मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दादरच्या शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर आले होते. मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. ही माहिती मिळताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवाजी पार्कात आले. त्यावेळी दोन्ही गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. याचवेळी आमदार अनिल परब, खासदार अनिल देसाई आणि महेश पेडणेकरही स्मृती स्थळावर आले. यावेळी गद्दार गद्दार… अशा घोषणा देण्यात आल्या. गद्दारांना हाकलून द्या… अशा घोषणा देण्यात आल्या. तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

आम्हाला मारण्यासाठी रॉड काढले

यावेळी शिंदे गटाचे नेते आमदार सदा सरवणकर यांनी गंभीर आरोप केला. आम्हाला मारण्यासाठी रॉड काढण्यात आल्याचा आरोप सदा सरवणकर यांनी केला. आम्ही दर्शन घेऊन जाणार होतो. हे लोक आले आणि त्यांनी राडा करण्यास सुरुवात केली, असं सदा सरवणकर म्हणाले. तर ही जागा कुणाच्या बापाच्या मालकीची नाही. यांच्या बापाची जागा नाही. ही जागा पालिकेची आहे. राज्य सरकारची आहे, अशी टीका शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी केली.

विघ्न आणण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही

उद्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे. त्यांचा स्मृती दिन शांततेत पार पडावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. कोणतंही विघ्न कुणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराच ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिला. ज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व माहीत आहे. ज्यांच्यावर बाळासाहेबांचे संस्कार झाले आहेत, ते लोक चौथऱ्याचं बॅरिकेड तोडणार नाही, असं देसाई म्हणाले.

सहानुभूती मिळवण्याचा प्रकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बाळासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आले होते. उद्या गर्दी होईल म्हणून आम्ही आलो होतो. पण त्यांनी गोंधळ सुरू केलाय. या लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हा गोंधळ सुरू आहे, असं शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

तोपर्यंत निघून जाणार नाही

तर, महिलांना धक्काबुक्की करण्यात आली. आम्हाला जाण्यास सांगितलं. तोडफोडही केली. पण आम्ही इथून निघून जाणार नाही. त्यांना आधी हटवा. हे लोक स्वत:ला समजतात काय? असा संताप शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केला. आम्हीच शिवसेना आहोत. आमच्याकडे चिन्ह आणि पक्ष आहे. तुमच्या पक्षाचं नाव काय हे त्यांना विचारा, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

जोरदार घोषणाबाजी

दरम्यान, यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृती चौथऱ्याजवळ येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी जमावाला दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही नेत्यांना धक्काबुक्कीही झाली. पोलिसांनीही दोन्ही गटाच्या नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दोन्ही गटाकडून एकमेकांना हातवारे करत टीका करण्यात आली. त्यामुळे शिवाजी पार्कात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.