Chavan Vs Fadnavis| विद्या चव्हाण यांच्या सुनेवर आरोपाचं प्रकरण काय होतं, ज्यावर अमृता फडणवीसांनी बोट ठेवलंय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाणांना सणसणीत उत्तर देत अमृता फडणवीसांनी त्यांना खडेबोल सुनावले. शिवाय एक जुने प्रकरणही उकरून काढले. आता जाणून घेऊयात या साठाउत्तराची संपूर्ण कहाणी.
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणीवर निषेध नोंदवताना राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मध्ये ओढत त्यांना डान्सिंग डॉल संबोधले. मात्र, येथून नवीनच महाभारत सुरू झाले. अमृता फडणवसीसांनी आता विद्या चव्हाण यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं असून, आपल्याच सुनेच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती विद्या चव्हाण, असे सणसणीत उत्तर दिले आहे. जाणून घेऊयात या साठाउत्तराची संपूर्ण कहाणी.
नेमकी सुरुवात कुठून?
भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख जितेन गजारिया. याने एक वादग्रस्त ट्वीट करून महाराष्ट्राच्या राजकारणात विनाकारण उकळी फोडलीय. त्याने त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली. आणि इथूनच महाविकास आघाडीचे नेते अपेक्षेप्रमाणे खवळले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आक्रमक झाल्या. त्यांनी या प्रकरणी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, हे सर्व प्रकरण पाहून मला मजेदार किस्सा आठवला. भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने राबडीदेवीचे उदाहरण दिले, असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावे वाटते, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.
अमृतांकडून वर्मावर बोट
अमृता फडणवसीसांनी विद्या चव्हाणांना उत्तर देताना त्यांच्या दुखऱ्या वर्मावर बोट ठेवले. शिवाय त्यांना अब्रुनुकसानीची नोटीस वेगळीच धाडली. त्यानंतर एक ट्वीट केले. त्यात त्या म्हणतात, आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे @NCPspeaks नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! @Vidyaspeaks मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण ! आता या ट्वीटने जुन्या उकाळ्यापाकाळ्या निघणारच.
आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे @NCPspeaks नेता विद्याहीन चव्हाण , आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण !@Vidyaspeaks मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण ! pic.twitter.com/Ydf7Z3aIEy
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 7, 2022
चव्हाणांच्या सुनेची तक्रार काय?
आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात मुंबईतील विलेपार्ले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातवाच्या जन्मासाठी सासरी छळ होत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांच्या सुनेने केला आहे. विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत चव्हाण, मुलगा अजित (तक्रारदार सुनेचा पती) दुसरा मुलगा आनंद आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने आपला छळ करण्यात येत होता, असा दावाही सूनेने केला आहे. तक्रारदार सुनेला पहिली मुलगी आहे. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मात्र मुदतीआधीच प्रसुती झाल्याने बाळ दगावले. त्यानंतर माझ्या छळात वाढ झाली, अशी तक्रार सुनेने दिली होती.या तक्रारीवरून विलेपार्ले पोलिस ठाण्यात पोलिसांनी कलम 498 अ, 354, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पवार, सुप्रियाताईंना साकडे
राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल केल्यानंतर सुनेने “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मला न्याय द्यावा,” अशी विनंतीही त्यांनी केली होती. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, “शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मला न्याय मिळावा यासाठी (Vidya Chavan daughter in law Issue) मदत करावी. मला माझ्या मुलीपासून तोडलं आहे. मला माझी मुलगी परत हवी. मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही. विद्या चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर कारवाई केली जावी. ही माझी विनंती आहे. मला न्याय मिळावा यासाठी मदत करा.”
चव्हाण म्हणतात, घरात नाक खुपसू नका
विद्या चव्हाण यांनी या नोटीसीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करत अमृता फडणवीस यांना टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, अमृता फडणवीस काहीही करू शकतात. त्यांनी काय करावे, काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी मिसेस फडणवीसांबद्दल काहीही वाईट बोलले नाही. माफी मागण्याचे काहीही कारण नाही. खरे तर भाजपवाल्यांना माझ्या घरात नाकं खुपसण्याचं गरज नाही. त्यावर कोर्टाचा निर्णय झालाय. मी सुनेला छळलंय, असं त्या कसं म्हणू शकतात. याचा त्यांनी काही पुरावा द्यावा. चांगली काम करणाऱ्यांची बदनामी सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. हे प्रकरण इथेच थांबणारे नाही. अजून वाद-विवादाच्या फैरी यावरून झडतील. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक तवंग उमटतील.
इतर बातम्याः
Video| पुन्हा अवकाळी तडाखा, शेतकऱ्यांना हुंदके अनावर; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला इशारा
Nashik| सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्ष साधना तोरणे यांचे निधन
Nashik Crime|भयंकर आक्रीत, चौथीतल्या मुलीला जंगलात फाशी देण्याचा प्रयत्न; पंचक्रोशीत खळबळ!