Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड शरण आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis: मला राजकारणात जायचे नाही. कोणाकडे पुरावे असेल तर द्या. काही लोकांना राजकारण हवे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांनी राजकारण करत राहावे. आमची भूमिका स्पष्ट आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेला वाल्मिक कराड अखेर २२ दिवसांनी शरण आला. त्याने मंगळवारी पुणे सीआयडी कार्यालयात शरणागती पत्कारली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा करुन संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे. या प्रकरणातील राजकारणावर मला काही बोलायचे नाही. परंतु काही लोकांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कोणीही असो कारवाई होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संतोष देशमुख प्रकरणातील प्रत्येकावर कडक कारवाई होईल. गुंडाचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कुठलाही आरोपी असला तरी आम्ही शोधून काढू. जोपर्यंत आरोपी फासावर लटकत नाही तोवर तपास सुरु राहील. या प्रकरणात कुणाचाही दबाव चालणार नाही. पोलीस पुराव्याच्या आधारावर कारवाई करतील. पुरावा असेल तर कोणालाही सोडले जाणार नाही. माझ्यासाठी संतोष देशमुख यांना न्याय देणे हे महत्वाचे आहे.
संतोष देशमुख यांच्या भावाशी संवाद
स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणे हे माझ्यासाठी महत्वाचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, संतोष देशमुख यांच्या बंधूशी माझे फोनवर बोलणे झाले आहे. त्यांना मी सांगितले आहे की, तुम्ही काही काळजी करु नका. सर्व आरोपींवर कारवाई होणार आहे. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. कोणाचाही दबाव चालणार नाही. पोलीस पुराव्याच्या आधारावर कारवाई करतील. जेथे पुरावा आहे, त्याला सोडले जाणार नाही. या प्रकरणी ३०२चा गुन्हा दाखल होणार का? ते पोलीस बघतील. पुराव्यांच्या आधारे पोलीस निर्णय घेतील. सीआयडीला स्वायतत्ता दिली आहे.
मला राजकारणात जायचे नाही
या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे का? या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला राजकारणात जायचे नाही. कोणाकडे पुरावे असेल तर द्या. काही लोकांना राजकारण हवे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांनी राजकारण करत राहावे. आमची भूमिका स्पष्ट आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो आम्ही मिळवून देऊ, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.