शरद पवार, उद्धव आणि राज ठाकरे यांना फोन केला होता, काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात राजकीय संस्कृती जी आहे ती टिकली पाहिजे. राजकीय संवाद कायम राहावा असा माझा प्रयत्न राहिल. यावेळी त्यांनी इतर नेत्यांना फोन केल्याचं देखील सांगितलं.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्ना उत्तर देताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘गेली अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार चालवलं. आज शपथविधीच्या निमित्ताने ज्या वेळेस मला एकाने विचारले की, महाराष्ट्र आता थांबणार नाही असे का म्हटले. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिली. रोल जरी आमचे बदलले असले तरी दिशा आमची तीच राहणार आहे. समन्वय देखील तोच राहणार आहे. मला विश्वास आहे की, ज्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत. जे प्रकल्प आम्ही सुरु केले असतील.’
दिलेली आश्वासनं पूर्ण करु
‘आमचा प्रयत्न असणार आहे की, मागच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात जी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याची पाऊलं उचलायची आहेत. एक लोकाभिमुख सरकार महाराष्ट्राला पाहायला मिळेल. अडचणी येतात त्या अडचणीवर मात करत मार्गक्रमण करु असा विश्वास आहे. महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की, हे सरकार पारदर्शिकतेने आणि गतीने त्यांच्या काम करेल.’
विरोधकांची संख्या कमी आहे. संख्येने आम्ही त्यांचे मुल्यमापन करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले त्या विषयाला योग्य सन्मान दिला जाईल. स्थिर सरकारचे पाच वर्ष पाहायला मिळेल. महाराष्ट्राने आता स्थिर सरकार दिले आहे. कुठलेही प्रकारचे २०१९ पासून जे वेगवेगळे बदल दिसले ते आता दिसणार नाही. असं ही फडणवीस म्हणाले.
लाडकी बहीण योजना सुरुच ठेवणार
लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस म्हणाले की, ‘ही योजना आम्ही सुरुच ठेवणार आहोत. २१०० ही देणार आहोत. बजेटच्या वेळी नियोजन करु. जी आश्वासनं दिली ती पूर्ण करु. ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या करु. निकषाच्या बाहेर कोणी घेतलं असेल. काही तक्रारी आल्या आहेत निकषाच्या बाहेर मिळाल्या आहेत. शेतकरी सन्मान योजना जेव्हा सुरु केली की, तेव्हा मोठ्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा फायदा घेतला. नंतर त्यातील अनेकांनी सांगितले की आम्ही या निकषात बसत नाही. या योजनेत ही निकषाच्या बाहेर असतील त्यांच्याबद्दल विचार होईल.’
विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशनात करु. मंत्रिमंडळाने शिफारस केली आहे. ९ तारखेला निवडणूक घ्यावी. विस्ताराची चर्चा झाली आहे. नागपूर अधिवेशनाच्या आधी आम्ही विस्तार करु. सरकार स्थापनेला उशीर झालेला नाही. एका पक्षाचं सरकार असतं तर लवकर होतं. खातेवाटपाचा निर्णय ही झाला आहे. असं ही फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
राजकीय संवाद राहावा यासाठी प्रयत्न
फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे. मात्र राजकीय संस्कृती जी आहे त्याबाबत विचार करण्याची सर्व पक्षांना गरज आहे. योग्य वातावरण कसं करता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी शपथविधीच्या निमित्ताने शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे अशा प्रमुख लोकांना फोन करुन निमंत्रण दिले. ते आज येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं राजकीय संवाद कधी संपला नाही. इतर राज्यांमध्ये पाहिले असेल की, खून के प्यासे असतात. पण महाराष्ट्रात असं राहू नये असा माझा प्रयत्न असेल. राजकारणात सगळेच राहतात. ते पण राहतील आणि आम्ही पण राहू.’