मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरे यांना मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीला आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स, ती व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री शिंदे हे विधानसभेत उत्तर देत असताना इकडे मुंबईत मोठी घडामोड घडली. आदित्य ठाकरे यांचे जवळचे पुण्यशाली पारीख यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले आहे. आजच आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहण्याचे समन्स त्यांना पाठविण्यात आले आहे.
मुंबई | 20 डिसेंबर 2023 : विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे पिता पुत्रावर गंभीर आरोप केले. राज्यातील जनता मृत्यूशी लढा देत भीतीच्या वातावरणात जगत होती. त्यावेळी पैसे लुटण्याचा किळसवाणा प्रकार पाहिअला तर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात तिडिक उठल्याशिवाय रहाणार नाही. कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदे कमी पडतील, असा थक्क करणारा प्रकार या एक फुल – एक हाफने केला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
कोविड काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी प्रकरणात घोटाळा झाला. अरेबियन नाईट आणि आता पर्शियन नाईट याच्या कथाही पुढे आल्या आहेत. इकडे माणसे मरत होती आणि ते नोटा मोजत होते. यात आणखी काही कथा पुढे येत आहेत. महापौर बंगल्यात बोलावून रेमडेसिव्हिर घेण्यासाठी काही रक्कम ठरविण्यात आली. जास्त दराने ही औषधी घेण्यात आली. महापालिकेच्या तिजोरीवर 6 कोटींचा डल्ला मारण्यात आला. अशा प्रकारे कोविड काळात गुन्हे घडले असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर देताना केला.
रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी प्रकरणात घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मायलन प्रयोगशाळा आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सुमारे 5.96 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. याच प्रकरणात महापालिका अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवेदनात आर्थिक गुन्हे शाखेला या संदर्भात कंत्राट देण्यासाठी महापौरांच्या बंगल्यावर त्यांना जेव्हा बोलावण्यात आले होते तेव्हा पारीख तिथे होते असे म्हटले आहे.
महापालिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यशाली पारीख यांना समन्स पाठविले आहे. आजच त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. एफआयआरनुसार हा घोटाळा सुमारे 5.96 कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनची किंमत 650 रुपये होती. परंतु, कोविड काळात ते 1568 रुपयांना खरेदी करण्यात आले होते. याच प्रकरणाची चौकशी सुरु आहे.