CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार ‘वर्षा’ निवासस्थानी शिफ्ट, मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, नंतर म्हणाले..
वर्षा या निवासस्थानी राहण्यापूर्वी तिथे पूजा करणार असल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत वर्षावर राहण्यास जाऊ, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाबाबतही विचारणा केली होती. त्यावर त्यांनी तूर्तास काहीही बोलण्यास नकार दिला.
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर (cabinet expansion)स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच एकनाथ शिंदे हे वर्षा (Varsha bungalow) या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी शिफ्ट होणार आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्याला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता, हो लवकरच वर्षा निवासस्थानी शिफ्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बंगल्यात काही डागडुजीचे काम सुरु असून, लवकरच ते पूर्ण होईल, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. वर्षा या निवासस्थानी राहण्यापूर्वी तिथे पूजा करणार असल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत वर्षावर राहण्यास जाऊ, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाबाबतही विचारणा केली होती. त्यावर त्यांनी तूर्तास काहीही बोलण्यास नकार दिला.
श्रीकांत शिंदे यांनीही केली होती सकाळी पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज सकाळीही वर्षा बंगल्याला भेट दिली होती. त्यावेळी सकाळी छोटेखानी पूजाही करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी उलटून ४० दिवसांनंतर त्यांनी आज पहिल्यांदा वर्षा निवासस्थानाला भेट दिली. त्यानंतर आता पुढील काही दिवस त्याची डागडुजी करण्यात येईल, त्यानंतर शिंदे तिथे राहणार असल्याची माहिती आहे.
वर्षा निवासस्थानी बैठका आणि कार्यालयीन कामकाज
वर्षा बंगल्याचा उपयोग एकनाथ शिंदे कार्यालयीन कामासाठी सुरु करणार असल्याचीही माहिती आहे. महत्त्वाच्या बैठकाही या निवासस्थानी पार पडणार आहेत. तसेच मंत्रालय आणि सह्याद्री अतिथीगृहावरही मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडतील. सकाळी एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी जाणार नसून, नंदनवन या बंगल्यावरच राहणार, अशी चर्चा होती. मात्र संध्याकाळी शिंदे यांनी आपण वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
खातेवाटपाबाबत उद्या सांगणार – मुख्यमंत्री
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला, त्यात शिंदे गट आणि भाजपाच्या १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. आज पहिली कॅबिनेट बैठकही पार पडली. मात्र अद्यापही खातेवाटप झालेले नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की याबाबत उद्या म्हणजे गुरुवारी माहिती देतो. म्हणजे उद्या खातेवाटपही जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुपारी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनीही खातेवाटपात मोठे बदल असतील असे संकेत दिले आहेत. आता खातेवाटपात कुणाकडे कोणती मंत्रिपदे येतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.