मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सत्तेत असणार, राज ठाकरे यांचं मोठं भाकीत
राज्यातील निवडणुकीच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, २०२४ चा मुख्यमंत्रा हा भाजपचाच असेल आणि मनसे सत्तेत असेल. राज ठाकरे यांच्या या भाकीतामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आणखी काय म्हणाले राज ठाकरे जाणून घ्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांबाबत मोठं भाकीत केलं आहे. महायुती विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढत असली तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यात आलेला नाही. जर महायुतीची राज्यात सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राज्यातील मतदारांना देखील प्रश्न पडला आहे. सध्या जरी कोणाचंही नाव चर्चेत असलं तरी राज ठाकरे यांनी याबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलंय की, 2024 चा मुख्यमंत्री भाजपचाच होईल. तर 2029 चा मुख्यमंत्री हा मनसेचा होईल. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांचं मोठं भाकीत
विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत आहे, तर तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. मनसेनं 100 पेक्षा अधिक जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे मनसेच्या किती जागा येतात याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागून आहे. यातच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र व्हिजन या कार्यक्रमात बोलताना यंदा 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे मोठं वक्तव्य केले आहे. निवडणूक निकालाआधी राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्यात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्टेटला राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे २०२४ चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आणि 2029 मध्ये राज ठाकरे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगू लागली आहे. तसेच यंदाचा मुख्यमंत्री हा मनसेच्या पाठिंब्यावरच होणार असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.
भाजप मॅच्युअर्ड पक्ष – राज ठाकरे
अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने आणि ठाकरे गटाने देखील आपल्या उमेदवार दिला आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, अमित विरोधात उमेदवार देणे हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग आहे. प्रत्येकजण स्वभावानुसार वागतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते पण सगळ्यांनाच हे कळेल असे नाही. इतरांचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असे ही राज ठाकरे म्हणाले.
मी पक्ष फोडला नाही – राज ठाकरे
शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्याने त्यावर ही राज ठाकरे यांनी वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, मी शिवसेनेतून बाहेर पडलो, मी पक्ष फोडला नाही. मला पक्ष फोडून पक्ष निर्माण करायचा नव्हता. वेळ लागला तरी चालेल. तेव्हा शक्य असूनही मी आमदार फोडले नाहीत. सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. फोडाफोडी करुन मवा सत्ता नको. पण महाराष्ट्र आताच्या परिस्थितीतून बाहेर येईल. महाराष्ट्र खूप मोठा आहे. असे ही राज ठाकरे म्हणालेत.