Report on Rashmi Shukla Top secret file : मुख्य सचिवांचा मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर, 6 मोठे गौप्यस्फोट
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तातडीने रश्मी शुक्ला आणि फोन टॅपिंग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला आहे.
मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तातडीने या विषयावरचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. यामध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांचे दावे, बदलीच्या प्रक्रिया आणि फोन टॅपिंग याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत (Chief Secretary Sitaram Kunte submit report on Rashmi Shukla Phone Tapping and Top secret file).
सीताराम कुंटे यांनी या अहवालात म्हटलं आहे, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार हा वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्यात येत आहे.”
अहवालातील 5 मोठे गौप्यस्फोट
1. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या काळात एकूण 167 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात 4 अपवाद वगळता सर्व बदल्या या पोलीस आस्थापना मंडळ 1 च्या शिफारशीप्रमाणे करण्यात आल्या आहेत.
2. पोलीस उपअधिक्षक आणि त्यापेक्षा उच्च दर्जाच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22 नुसार पोलीस आस्थापन मंडळ 1 च्या शिफारशी प्रमाणे होतात. या मंडळात त्यावेळी अप्पर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे (अध्यक्ष), पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल (उपाध्यक्ष), मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (सदस्य), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस महासंचालक रजनिश सेठ (सदस्य) आणि अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल (सदस्य) यांचा समावेश होता.
3. दहशतवाद, दंगली घडवणे किंवा दंगलींचे नियोजन करणे या कृत्यांच्या आधारे रश्मी शुक्ला यांनी खासगी व्यक्तींचे फोन टॅप करण्याची परवानगी मिळवली. त्याआधारे त्यांनी काही लोकांचे फोन टॅप केले आणि त्यात बदल्यांसंदर्भात उल्लेख करुन अहवाल सादर केला. या अहवालात कोणताही सबळ पुरावा नव्हता. केवळ फोन टॅपिंगचा उल्लेख होता. त्यामुळेच या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीची मागणी फेटाळण्यात आली.
4. रश्मी शुक्ला यांनी ज्या काळात हे फोन टॅप केले त्या काळात सरकारने कोरोनाच्या व्यवस्थापनामुळे कोणतीही बदली केलेली नाही. तसा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नव्हता. त्यामुळे या अहवालात खासगी संभाषणाचा संबंध बदल्याशी जोडणे शक्य नव्हतं. त्यामुळेच या अहवालावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
5. रश्मी शुक्ला यांनी खोटी कारणं सांगून फोन टॅपिंगची परवानगी मिळवली आणि जाणीवपूर्वक दिशाभूल केली. त्यांनी इंडिया टेलिग्राम कायद्याचा गैरवापर केला. ही बाब गंभीर असल्याने त्यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण घेण्यात आले. ही बाब रश्मी शुक्ला यांना समजल्यानंतर त्यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्री यांची भेट घेऊन माफी मागितली. तसेच पतीचे कॅन्सरने निधन झाले, मुलं शिकत आहेत अशी कारणं सांगितली. तसेच चूक कबूल करुन बदल्यांबाबत दिलेला अहवाल मागे घेण्याची परवानगी मागितली. मात्र, असा अहवाल मागे घेण्याचा प्रघात नसल्याने तो अहवाल तसाच ठेऊन सहानुभूती आणि सौजन्याच्या दृष्टीकोनातून सरकारने कारवाई केली नाही.
6. रश्मी शुक्ला यांनी सरकारला सादर केलेल्या अहवालासोबत कोणताही पेन ड्राईव्ह नव्हता. त्यामुळे माध्यमांमध्ये उघड करण्यात आलेला अत्यंत गोपनीय अहवाल रश्मी शुक्ला यांच्या ऑफिस कॉपीचा असल्याचं सकृतदर्शनी दिसत आहे. त्यामुळे शुक्ला यांनीच हा गोपनीय अहवाल उघड केल्याचा संशय आहे. ही बाब गंभीर असून ही बाब सिद्ध झाल्यास त्या कठोर कारवाईस पात्र आहेत. त्यांच्या या कृतीमुळे अहवालात उल्लेख करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही बदनामी झाली आहे.
हेही वाचा :
Phone Tapping : रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणार?, मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर
‘या’ आमदाराला रश्मी शुक्लांनी धमकावलं, जितेंद्र आव्हाडांनी आमदाराचं नावही सांगितलं!
संजय राऊतांचा इशारा खरा ठरणार; फोन टॅपिंग प्रकरण विरोधकांवरच बुमरँग होणार?
व्हिडीओ पाहा :
Chief Secretary Sitaram Kunte submit report on Rashmi Shukla Phone Tapping and Top secret file