देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, बड्या अधिकाऱ्यांना सूचना, नेमका प्लॅन काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुशासन सुधारण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर भर देऊन, केंद्राशी समन्वय वाढवून, जनता दरबार आणि इतर महत्त्वाच्या कामांना वेग देण्याचे आवाहन केले आहे. वॉररूमची कार्यक्षमता वाढविणे, पोर्टल्स अपडेट करणे आणि 'इज ऑफ लिव्हिंग'वर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता अॅक्शन मोडवर आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात सरकारची दिशा काय असेल याबाबत स्पष्ट केले. पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर द्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या, अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा. यासाठी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभारा. वॉररूम आणखी कार्यक्षम करा. कोणते प्रकल्प त्यात असले पाहिजे, याची नव्याने रचना मुख्य सचिवांनी करावी. पहिली बैठक डिसेंबर अखेरीस व्हावी. एक वॉररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच, पण दुसरी वॉररूम आता केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी असेल. त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यत लाभ गतीने पोहोचले पाहिजे, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली.
जनता दरबार, लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या. हे कार्यक्रम सुरू झालेच पाहिजे, ते तळागाळात नेले पाहिजे. आपले सरकार पोर्टल पुन्हा नव्याने पूर्ण क्षमतेने चालवा. पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात प्रवास तत्काळ सुरू करावे. आपल्या अनुभवाचा फायदा त्या-त्या जिल्ह्यांना करून द्या, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांना केल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी काय-काय सूचना केल्या?
वेगवेगळ्या विभागाचे पोर्टल अपडेट करा. ते अधिक प्रभावी करा. त्यातून लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या लोकांना कशा मिळतील, यावर भर दिला पाहिजे. उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येईल. सर्व संकेतस्थळ हे RTI फ्रेंडली करा. 26 जानेवारीपर्यंत यावर टार्गेट करा, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
‘इज ऑफ लिव्हिंग’वर सर्वाधिक भर द्या. सर्वाधिक लोक आपल्याकडे कशासाठी येतात आणि त्यांना त्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर द्या. 6/6 महिन्यांचे दोन टप्पे करून हे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी माजी अधिकाऱ्यांची समिती गठित करून एक अभ्यास अहवाल तयार करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष द्या. त्यांचा थेट सचिवांशी संवाद आणि त्यातून त्यांच्या समस्यांचे निराकरण करा. नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या. जेणेकरून त्यांना काम करणे सोपे होईल. महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य. पण नंबर 1 वर आहोत, म्हणून थांबू नका. जुनी पुण्याई असली तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे. तंत्रज्ञानाचा महत्तम वापर करा. सर्व अडचणी दूर करा. 100 दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करावा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.