मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India) शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्हाबद्दलची लढाई जिंकल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अनेक महिन्यांपासून रखडला आहे. अखेर एकनाथ शिंदे यांना शिवसेना मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हं आहेत. हे अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्याआधी विस्तार होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पडद्यामागे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कौल्हापुरातील दौऱ्यादरम्यान महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात कोल्हापूर दौऱ्यादरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झालीय.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यापुढे मांडली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय. त्यामुळे आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमधील सर्वात चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार. राज्यात आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली. त्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला.
मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार झाला त्यावेळी 18 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला. पण त्यानंतर आठ महिने होत आली तरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी प्रश्न विचारला असता त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं उत्तर दिलंय. पण मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही.
शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मुद्द्यावरुन काही आमदारांनी उघडपणे नाराजीदेखील व्यक्त केलीय. पण तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळाच्या मुद्द्यावरुन शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या वारंवार समोर आल्या आहेत.
या सगळ्या घडामोडींनंतर आता मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आतापर्यंत 9 आमदारांना मंत्रिपद मिळालं आहे. तर 14 ते 15 आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. यापैकी किती आमदारांना संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.