विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते गैरहजर राहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चांना आणखी उधाण आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी अजित पवार यांच्या गैरहजेरीबद्दल प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते बैठकीला येऊ शकले नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पण राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नाराजी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत. याच सगळ्या घडामोडींदरम्यान आणखी एक मोठी घडामोड घडत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. विशेष म्हणजे अजित पवार हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिले नाहीत. तसेच ते दिल्लीला देखील वरिष्ठांच्या भेटीसाठी गेलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काय घडतंय? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
सत्ताधारी पक्षांमध्ये सध्या सारं काही आलबेल नाही, अशी चर्चा रंगताना दिसत आहेत. अजित पवार यांच्याकडून बैठकांच्या धडाका सुरु असल्यामुळे पुण्यातील भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती. पुण्याचं पालकमंत्रीपद भाजपकडे आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पण अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. याशिवाय इतर जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुनही सत्ताधारी पक्षांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस दिल्लीतील वरिष्ठांकडे आपापल्या आमदारांची भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हाच शिंदे गटात धुसफूस सुरु झाली होती. अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्याने मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एक वाटेकरी निर्माण झाला. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाच्या नेत्यांसाठी देखील मंत्रिपदं देण्यात आली. यावेळी शिंदे आणि भाजपकडील काही महत्त्वाची खाते अजित पवार यांच्या गटाला मिळाली. अजित पवार यांना स्वत:ला अर्थ खातं मिळालं. याशिवाय त्यांच्या गटाला शिंदे गटाकडे असणारं कृषी खातं मिळालं. यावरुन बरीच चर्चा सुरु होती. विशेष म्हणजे त्यावेळी शिंदे गटाच्या नेत्यांनी जाहीरपणे अजित पवार यांच्या सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.