नुकसानग्रस्तांना 10 हजाराची आर्थिक मदत, टपरीधारकांनाही पहिल्यांदाच भरपाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या दुकानदाराला मदत दिली जात नव्हती. त्यांनाही आता आर्थिक भरपाई करण्यात येणार आहे. टपरीधारकांसाठी सुद्धा मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई | 28 जुलै 2023 : राज्यात पाऊस पडतोय. पावसाची आधी प्रतिक्षा सर्वांनाच होती. आता पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पाऊस जास्त झाल्याने नागरिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत केली जात आहे. प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देतानाच पूरामुळे नुकसान झालेल्यांना तात्काळ 10 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच पान टपरी आणि ठेलेधारकांनाही पहिल्यांदाच आर्थिक मदत करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते विधानसभेत बोलत होते.
पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांना करावयाची मदत आम्ही वाढवली आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे आपण शेतकऱ्यांना मदत केली आहे. दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले आहे. 10 हजार कोटींचे आतापर्यंत वाटप केले आहे. सतत पावसामुळे होणारं नुकसान त्यासाठी भरपाईची मागणी होती. त्यासाठी 1500 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. पीक सन्मान योजनेत 6 हजार रुपयांची आणखी भर टाकली. म्हणजे शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
ज्यांचं नुकसान झालं. ज्यांच घर पाण्यात बुडाले, घरे पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा पूर्णपणे पडले असल्यास कपडयांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये आणि घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये असे 5 हजार रुपये देण्यात येतात. पण आता आपण ही मदत 10 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दुकानदारांना 50 हजार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेल्या दुकानदारांना 50 हजार रुपये मदत देणार असल्याचं स्पष्ट केलं. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या दुकानदाराला मदत दिली जात नव्हती. त्यांनाही आता आर्थिक भरपाई करण्यात येणार आहे. दुकान पाण्यात बुडालेले असल्यास, दुकान पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा दुकानांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास अशा दुकानदारांना नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे आणि जे रेशनकार्ड धारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
टपरीधारकांना 10 हजार
टपरीधारकांसाठी सुद्धा मदत जाहीर करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त टपरीधारकांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही. आता या टपरीधारकांना सुद्धा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलं.