मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी 50 खोक्यांच्या टीकेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळाल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाला 50 कोटी रुपये दिले, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.
“आमच्या 50 आमदारांना तुम्ही वारंवार हिणवत आहात. खोके आणि गद्दार हे दोनच शब्द आहेत. खोके आणि गद्दार यांचादेखील सोक्षमोक्ष लावला पाहिजे. खरं म्हणजे या महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे? हेही बघायला पाहिजे म्हणून मी आपल्याला सांगतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“अध्यक्ष महोदय, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, ज्यांनी महाराष्ट्राच्या मतदारांशी गद्दारी केली, बेईमानी केली, 25 वर्षाच्या जुन्या मित्राशी बेईमानी केली आणि ज्यांनी शिवसैनिकांशी गद्दारी केली आणि आपल्या परिवारांशी केली ते कोण? मला या सगळ्या गोष्टी बोलायला आवडत नाही. पण कुणी बेईमानी केली? कुणी विश्वासघात केला? अरे आम्ही तर ज्यांच्याबरोबर युतीमध्ये निवडून आलो, त्यांच्याबरोबर युती करुन आम्ही सरकार स्थापन केलं”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“खूप गोष्टी आहेत, बोलता येतील, पण एक संयम आम्ही बाळगतो, आम्हाला बोलता येत नाही हे कुणी समजू नये. 50 खोके तुम्ही करता, मी एक गोष्ट सांगू इच्छितो, आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करता, रोज शिव्याशाप देता आणि आमच्याकडेच 50 कोटी रुपये आमचे द्या म्हणून पत्र देता?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
“हे 50 कोटी रुपये जे शिवसेनेच्या खात्यामधले आहेत, आता शिवसेना कुणाकडे, धनुष्यबाण कुणाकडे आहे? आज हे पत्र आहे की, हे 50 कोटी रुपये तात्काळ आमच्या खात्यात वर्ग करा. म्हणजे आम्हाला गद्दार म्हणायचं, शिव्या द्यायचं, आम्हाला खोके म्हणायचं, मग खरे खोकेबाज आणि धोकेबाज कोण?”, असाही सवाल त्यांनी केला.
“पृथ्वीराज बाबा मी एक मिनिटाचा विचार केला नाही. मी तात्काळ सांगितलं की, हे त्यांचे देवून टाका. कारण मी अगोदरच सांगितलं होतं, तुमची संपत्ती आम्हाला नको. बाळासाहेब ठाकरे यांचा विचारच आमच्यासाठी संपत्ती आहे. आता ते कुठे गेले, कसे गेले? हे आता पुढे बघा”, असं मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले.
“ज्यांना बाळासाहेबांची पडली नाही, शिवसेनेची पडली नाही, शिवसैनिकांशी काही देणंघेणं नाही त्यांना फक्त पैसे, 50 खोके यावरच त्यांचा सर्व डोळा आहे. म्हणून इतर लोकांनी नक्की विचार करावा. अशोकराव हे सहन करण्याच्या पलिकडच्या गोष्टी म्हणून मी एकच काढलेलं आहे. आणखी खूप आहे”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.