Ganeshotsav 2023 | गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे कोकणवासीयांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या 18 सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सव सणाला सुरुवात होणार आहे.
मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच गणेशोत्सवाचा उत्साह असणार आहे. गणेशोत्सव आणि कोकण हे समीकरणच आहे. कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच जल्लोष असतो. या सणाला कोकणात विशेष महत्त्व असतं. कोकणवासी एकवेळ दिवाळीला गावी जाणार नाहीत मात्र गणेशोत्सवाला नक्की जातील. त्यामुळे गणेशोत्सवाला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या, खासगी आणि सरकारी बस गाड्या फुल आणि भरगच्छ भरलेल्या असतात. अनेकजण आपल्या स्वत:च्या वाहनांनी देखील गावी जातात. या गणेश भक्तांसाठी सरकारने खूप मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतलाय.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे कोकणवासीयांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
‘या’ कालावधीत टोल फ्री
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.
‘अशी’ मिळणार सवलत
या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.