मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांसोबत बोलावली तातडीची बैठक, पडद्यामागे काय घडतंय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत काय चर्चा होते? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण या निवडणुकीच्या आधी महायुतीत असणारी धुसफूस सर्रासपणे समोर येत आहे. अगदी मोठमोठे मंत्री उघडपणे सत्ताधारी मित्रपक्षाबाबत उद्विग्नता व्यक्त करत आहेत. त्यामुळे महायुतीबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन झाल्यानंतर वर्षभराने सहभागी झाला होता. विशेष म्हणजे अजित पवार यांचा पक्ष सत्तेत सहभागी झाला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काहीच माहिती नव्हतं.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून उघडपणे आपल्या मंत्रिपदावरुन नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पण नंतर महायुतीत योग्यप्रकारे समन्वय साधण्यात आला. सर्व सत्ताधारी आमदारांना याबाबत मुख्यमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. पण तरीही महायुतीत सातत्याने कुरबुरी समोर येत असतात. आतादेखील शिवसेनेच्या दोन मोठ्या मंत्र्यांची वक्तव्ये समोर आले आहेत. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल आहे ना? अशा चर्चांना उधाण आलं आहे. संबंधित परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुलाबराव पाटील मुंबईला रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक बोलावण्यात आली आहे. महायुतीत समन्वय राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रात्री उशिरा ही बैठक होऊ शकते. या बैठकीसाठी मंत्री गुलाबराव पाटील जळगावहून तातडीने मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. अर्थखातं नालायक असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीत बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत वादंग रंगलेलं असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याबाबत वक्तव्य केलं. अर्थ खातं हे नालायक खातं आहे. माझ्या फाईली तिथून परत येतात, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. या दोन बड्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा आहे. हीच धुसफूस मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना सूचना देण्याची शक्यता आहे.