मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?, सर्वपक्षीय बैठक सुरू; देशाचं लक्ष
मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच चिघळला आहे. एकीकडे आरक्षणावर तोडगा निघत नाहीये तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील टप्प्या टप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवत आहेत. त्यामुळे आंदोलन अधिकच तीव्र होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सुरू झाली असून बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : कुठे गावबंदी करण्यात आलीय, तर कुठे वाहने अडवली जात आहे. कुठे नेत्यांची घरे जाळली जात आहेत, तर कुठे वाहनांची जाळपोळ सुरू आहे. आजपर्यंत शांततेत आंदोलन करणारा मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे. हिंसक आंदोलन करत आहे. सरकारने 30 दिवस मागितले. 40 दिवस देऊनही सरकारकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याने मराठा तरुण हतबल झाला आहे. याच नैराश्यातून त्याने थेट हिंसक पवित्रा हाती घेतला आहे. तरीही सरकारकडून आरक्षणावर तोडगा काढला जात नाहीये. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केलीय. पण मनोज जरांगे पाटील यांना अर्धवट आरक्षण मंजूर नाहीये. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली असून बैठकीला सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे सर्व पक्षीय नेते सह्याद्रीवर आले असून बैठकीला सुरवात झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून ते वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. तसेच मनसेपासून ते जनता दल, रासप आणि माकपलाही बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा होणार आहे. उद्याच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तोडगा कसा निघणार?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी केली आहे. मराठ्यांना कुणबींचे सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य होत नसेल तर मराठ्यांना 50 टक्क्यांच्या आत टिकणारं आरक्षण देण्याची मागणी केली आहे. हे आरक्षण टिकेल असंच हवं आहे. तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका आहे. एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्यांना देणार नसल्याचं सत्ताधारी आणि विरोधक म्हणत आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
बैठकीला कोण कोण येणार
या बैठकीला 27 नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे, भाजपचे प्रदेशााध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, शेकापचे जयंत पाटील, बविआचे हितेंद्र ठाकूर, जनता दल (यू)चे कपिल पाटील, जनसुराज्यचे विनय कोरे, रासपचे महादेव जानकर, प्रहारचे बच्चू कडू, मनसेचे राजू पाटील, अमरावतीचे आमदार रवी राणा, माकपचे विनोद निकोले, वंचितचे प्रकाश आंबेडकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, आरपीआय गवई गटाचे राजेंद्र गवई, आरपीआय आठवले गटाचे गौतम सोनावणे आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखाताई कुंभारे यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आलं आहे.