राजकीय घडामोडींना वेग की आणखी काही?; गुवाहाटी दौऱ्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी सर्वच्या सर्व 50 आमदारांची बैठक बोलावली
नुकताच सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. त्यात आता जर लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप युतीला जबर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई: शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्हं कुणाला मिळणार याबाबतचा अजूनही निर्णय झालेला नाही. ठाकरे आणि शिंदे गटाने याबाबतचं लेखी म्हणणं निवडणूक आयोगाला दिलं आहे. मात्र, आयोगाने त्यावर अजून निर्णय दिलेला नाही, असं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र, त्यांच्या गटाच्या सर्वच्या सर्व 40 आमदारांसह 10 अपक्ष आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोणत्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली याचं कारण गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या बैठकीमुळे राज्यात काही राजकीय घडामोडी घडणार आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांना आज भेटीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे शिंदे गटाचे सर्व 50 आमदार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. ही भेट कशासाठी आहे? या मागचं कारण काय? बैठकीचा विषय काय? हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. साधारण दुपारी ही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षचिन्हं आणि शिवसेना कुणाची याचा निर्णय अंतिम टप्प्यात असताना आजची बैठक महत्वाची मानली जात आहे.
पात्र-अपात्रतेवरही चर्चा?
निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या विरोधात निर्णय दिला तर काय करायचं? यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या शिवाय सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवल्यास पक्षाची भूमिका काय असली पाहिजे, यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोटनिवडणुकीत पाठिंबा देणार?
तसेच राज्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच दुपारपर्यंत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचं चित्रं स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरही बैठकीत चर्चा होऊ शकते असं सांगितलं जातं.
सर्व्हेवर चर्चा?
नुकताच सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. त्यात आता जर लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप युतीला जबर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युती पूर्वीचा हा सर्व्हे आहे. या युतीनंतर शिंदे गट आणि भाजपला आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेही आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
विस्तारावर चर्चा
गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचं घोंगडं भिजत आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या नेमणुकाही झाल्या नाहीत. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. अनेक आमदारांना मंत्री होण्याचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.