मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितला गणिताचा नवीन फार्मूला, काय आहे वाचा
राज्यातील तीन-चार हजार लोकांना भेटून अंदाज व्यक्त होत असेल तर ते शक्य नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत जे यश बाळासाहेबांची शिवसेना व भाजपला मिळाले तो आधार घेतला पाहिजे होता. त्या सॅम्पल सर्व्हेतून खरी आकडेवारी मिळाली असती.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर शुक्रवारी पुन्हा हल्लाबोल केला. एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. या ओपनियन पोलमुळे अनेकांना हर्षवायू झाला असेल तर त्यांना होऊ द्या, आपण काम करत राहणार आहे. परंतु त्यांना दीड वर्षांनंतर चार ते सहा जागांसाठी राखता येणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आघाडीला चार-सहा जागा मिळतील
काही मुठभर लोकांमधून पाहणी करुन अंदाज बांधता येणार नाही. राज्यातील तीन-चार हजार लोकांना भेटून अंदाज व्यक्त होत असेल तर ते शक्य नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत जे यश बाळासाहेबांची शिवसेना व भाजपला मिळाले तो आधार घेतला पाहिजे होता. त्या सॅम्पल सर्व्हेतून खरी आकडेवारी मिळाली असती. आघाडी होणार आहे, असे गृहीत धरुन अंदाज बांधणे चुकीचे आहे. कारण राजकारणात व निवडणुकीच्या गणितात २ + २ = ४ कधीच होत नाहीत. ते मायनस किती होईल, हे येणारा काळ ठरवेल हे लक्षात घेतलं पाहिजे. महाविकास आघाडीने चार ते सहा जागा राखल्या तरी खूप आहे.
मोदींची लोकप्रियता विक्रम मोडणार
महाविकास आघाडीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आता जितके खासदार आहे तेवढ्या जागा देखील राखता येणार नाहीत. महाराष्ट्रात आम्ही जे काम आम्ही करतोय, ते लोक पाहत आहेत. गेल्या अडीच वर्षात काम झाले नव्हती. सर्व प्रकल्प बंद होते. आता सर्व प्रकल्पांचे काम जोराने सुरु आहे. यामुळे प्रकल्प थांबवले होते, त्यांना लोक पसंती देतील की काम करणाऱ्यांना पसंती देतील, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. देशात नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात मोठी लोकप्रियता आहे. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व विक्रम मोडीत निघतील. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळेल.