मुंबई : “होळी पौर्णिमेनिमित्त ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या होलीकोत्सवात सहभागी होत मनोभावे पूजन केले. जळणाऱ्या अग्नीसोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात व्हावेत आणि सद्विचारांचा सहवास घडावा अशी प्रार्थना केली. राज्यातील नागरिकांना होलिकोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संपूर्ण राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचं सांगितलं.
“होळीचा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक उत्साहान साजरी करत असतात. तमाम महाराष्ट्रातील जनतेला होळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील संपूर्ण दुःख या होळीमध्ये जळून खाक होऊ द्या. महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंद भरभरून वाहू द्या, हीच इच्छा व्यक्त करतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“जनतेच्या जीवनामध्ये विविध रंग उधळू द्या, हीच इच्छा मी व्यक्त करतो. सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे रंग तमाम महाराष्ट्रातील नागरिकांच्या चरणी येऊ हीच प्रार्थना करतो. संपूर्ण जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन धुळवड साजरी करतात. पर्यावरण पूर्वक होळी साजरी करावी असं आव्हान मी महाराष्ट्रातील जनतेला करतो. रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरावे. पर्यावरण पूरक ही होळी संपूर्ण नागरिकांनी साजरी करावी असा आवाहन मी नागरिकांना करतो”, असं देखील शिंदे म्हणाले.
“जिथे-जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तिथे-तिथे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं. मात्र पुढे त्यांनी बोलताना चांगली सद्धबुद्धी मिळावी आणि त्यांना शुभेच्छा असं खरमरीत वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.