एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत, अमित शाहांची घेतली भेट, दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीसही आंधारात?
eknath Shinde meet amit shaha: विधानसभेसाठी एकनाथ शिंदे यांनी आपली रणनीती अमित शाह यांना सांगितली. त्यासंदर्भातील एक सादरीकरण त्यांनी दिले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाला कोणत्या मुद्यांवर अडचणीत आणता येईल, त्यांची कच्चे दुवे काय? हे एकनाथ शिंदे यांनी सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा दावा मजबूत केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची राज्यातील राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री अचानक दिल्ली गाठली. त्यांच्या या दिल्ली दौऱ्याची कोणालाच माहिती नव्हती. दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक ते दीड तास चर्चा झाली. या दौऱ्याबाबत राज्यातील भाजप नेते अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा अंधारात होते, अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर लोकसभा निवडणुकीतील आपला रिपोर्ट कार्ड मांडला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आपली कामगिरी कशी चांगली झाली? हे आकडेवारीवरुन सांगितले. यामुळे एकनाथ शिंदे आता जास्त जागांवर दावा करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
का होता एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा
शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणालाही थांगपत्ता लागू न देता रविवारी रात्री अचानक दिल्ली गाठली. त्यांनी दिल्लीत भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीतील अहवाल आणि विधानसभा निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात विरोधी वातावरण होते. त्यानंतर शिवसेना उबाठापेक्षा आपली कामगिरी चांगली झाली. राज्यात दोन्ही पक्षांमध्ये सात ठिकाणी थेट लढत झाली. त्या लढतीत तेरापैकी सात जागा किती फरकाने जिंकल्या, त्यांच्या शिवसेनेला एकूण किती मतदान मिळाले, उबाठाच्या शिवसेनेला किती मते मिळाली, हा संपूर्ण अहवाल एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर ठेवला.
यवतमाळ, हिंगोली, नाशिकमध्ये काय घडले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवताळ, हिंगोली आणि नाशिकमध्ये काय घडले? ते अमित शाह यांच्या लक्षात आणून दिले. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी १३ ठिकाणी लढत होती. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पंधरा जागा मागितल्या होत्या. भाजपच्या स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळे यवतमाळ आणि हिंगोलीत उमेदवार बदलावा लागला. नाशिकमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार निश्चित झाला नव्हता. त्याचा फटका शिंदे सेनेला बसला.
विधानसभेसाठी केला दावा मजबूत
विधानसभेसाठी एकनाथ शिंदे यांनी आपली रणनीती अमित शाह यांना सांगितली. त्यासंदर्भातील एक सादरीकरण त्यांनी दिले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाला कोणत्या मुद्यांवर अडचणीत आणता येईल, त्यांची कच्चे दुवे काय? हे एकनाथ शिंदे यांनी सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा दावा मजबूत केला. कारण जागा वाटपावर अंतिम निर्णय भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींकडूनच होणार आहे. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन सोमवारी सकाळी मुख्यमंत्री नागपूरला परतले. त्यानंतर त्यांचा भंडारा दौरा सुरु झाला होता.