निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: चिंचवड आणि कसबापेठ विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन करून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला की नाही याबाबत संभ्रम होता. त्याबाबत खासदार संजय राऊत यांना विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संपर्क साधला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला की नाही याबाबत संभ्रम होता. त्याबाबत थेट संजय राऊत यांनाच विचारण्यात आलं. त्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे संपर्क केला नाही. होण्याची शक्यता नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून सहकारी पक्षासोबत राहू, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
अंधेरी अपवाद असला तरी तिथे निवडणूक झाली. पंढरपूरलाही झाली. तिथे अपवाद पाळला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं असलं तरी आणि राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी या दोन्ही निवडणुका होतील. निवडणुका बिनविरोध होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दोन्ही मतदारसंघातील वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही. विधानसपरिषदेच्या निवडणुकीतून जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या निवडणुकीत विधान परिषदेच्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, राज्याच्या राजकारणात कटुता वाढली आहे. ती संपली पाहिजे. त्यासाठी ते पुढाकार घेणार होते. त्यांचं पाऊल का पुढे पडलं नाही. याबाबत संभ्रम आहे, असा टोला राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.
भराडी देवीच्या यात्रेवेळी सत्ताधाऱ्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देवी शतकानुशतके आहे. भाविक येतात आणि जातात. देवीला मानत असू तर देवी पापी आणि बेईमान लोकांच्या पाठी राहणार नाही. कोकणातील देवी खूप जागृत असते, असा चिमटा त्यांनी काढला.
मु्ंबईच्या अर्थसंकल्पावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बजेटमध्ये मुंबईला कशी टोपी लावली आहे हे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. रिझर्व्ह फंडाचा गैरवापर होत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे, असं ते म्हणाले.