मोदी मुंबईत आल्यानं ॲसिडिटी होण्याचं कारण काय?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मविआला टोला
त्यांचं सरकार असताना त्यांनी केंद्र सरकारला सहकार्य मागितलं असतं तर त्यांनाही केंद्राने सहकार्य दिलं असतं. प्रत्येकवेळी कडसिंग बनून चालत नाही. त्यांनी केंद्राला मदत मागायला हवी होती. त्यांनी मागितली नाही. विनंती तर केली पाहिजे ना, असंही ते म्हणाले.
मुंबई: आम्ही मुंबईच्या विकासाची कामे करत आहेत. धडाधड निर्णय घेत आहोत. निर्णयातील अडसर दूर करत आहोत. त्यामुळे या कामांचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. पंतप्रधान मुंबईत विकासकामाच्या उद्घाटनाला आले तर कुणाला ॲसिडिटी होण्याची गरज काय? कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मग हे शहर त्या पद्धतीने असावं की नाही? या शहराच्या विकासासाठी आम्ही काही निर्णय घेतले तर त्यात काय चूक केली? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
‘टीव्ही 9 मराठी’ने दादरच्या वीर सावरकर स्मारकात महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध प्रश्नांची सडेतोड आणि दिलखुलास उत्तरे दिली.
मोदींना लोकप्रियतेची गरज काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार मुंबईत येत आहेत. या विरोधकांच्या आक्षेपाचाही त्यांनी समाचार घेतला. मुंबई काय देशाच्याबाहेर आहे काय? पंतप्रधान मुंबईतच का येतात असं म्हणून कसं चालेल? पंतप्रधानांना मुंबईत फ्लॅट घ्यायची गरज नाही. ज्यांना गरज आहे. त्यांनी शोधत राहावं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
जगात ज्यांची लोकप्रियता एक नंबरला आहे. त्यांना प्रसिद्धीसाठी वेगळं काही करण्याची काही गरज आहे काय? त्यांना मुंबईवर फोकस ठेवण्याची गरज काय? असा सवालही त्यांनी केला.
विकासापासून वंचित ठेवलं
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काही करत नाही. निवडणुका येतात आणि जातात. सत्ता कुणाच्या नावावर नसते. पण 25 वर्ष सत्ता असताना, पालिकेकडे पैसा असताना त्यांनी मुंबईकरांना विकासापासून वंचित ठेवलं, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.
विकास का नाही केला?
पालिकेच्या डिपॉझिटवर राज्य सरकारचा डोळा आहे, या प्रश्नावर त्यांनी टोला लगावला. आमचा विकासकामावर डोळा आहे. जनतेचा विकास कसा होईल यावर आमचा भर आहे. इतकी वर्ष महापालिका तुमच्याकडे होती. मग तुम्ही विकास काम का केलं नाही? तुम्हाला कोणी रोखलं होतं? पालिकेचं डिपॉझिट कशासाठी आहे? तुम्ही का नाही लोकांना या पैश्यातून सुविधा दिल्या? असा सवालही त्यांनी केला.
कडकसिंग बनून चालत नाही
त्यांचं सरकार असताना त्यांनी केंद्र सरकारला सहकार्य मागितलं असतं तर त्यांनाही केंद्राने सहकार्य दिलं असतं. प्रत्येकवेळी कडसिंग बनून चालत नाही. आमच्या नगरविकास खात्याने 15 हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला. कोणताही काटछाट न करता आम्हाला 15 हजार कोटी मिळाले.
दोन वंदे भारत ट्रेन दिल्या. रेल्वेसाठी 13500 कोटी केंद्राने दिले. एमयूटीपीसाठी 1100 कोटी दिले. केंद्राने इन्फ्रासाठी 10 लाख कोटी ठेवले होते. त्यांनी केंद्राला मदत मागायला हवी होती. त्यांनी मागितली नाही. विनंती तर केली पाहिजे ना, असंही ते म्हणाले.