‘I.N.D.I.A ची फोड, सर्वांचा फुलस्टॉप होणार’, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचा सर्वात मोठा दावा
इंडिया आघाडीची मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी 28 पक्षांचे प्रमुख नेते मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे.
मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या हालचाली सध्या मुंबईत घडत आहेत. मुंबई हे देशाच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनलं आहे. कारण विरोधी पक्षाचे अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहेत. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची आज आणि उद्या अतिशय मोलाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय जोराने हालाचाली घडत आहेत. असं असताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून या बैठकीवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे शिलेदार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका करत अनोखा दावा केलाय.
उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नावाची वेगळीच फोड करुन निशाणा साधला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र येत आहेत. पण या सर्व पक्षांचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव होईल, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पुन्हा विजय होईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा त्यांनी केलाय.
सामंत यांच्याकडून I.N.D.I.A नावाची फोड
“खासदारकीची निवडणूक झाली की, I चा अर्थ इंडियन काँग्रेस फुल स्टॉप, N म्हणजे जी NCP त्यांच्याबरोबर आहे ती फुलस्टॉप, D म्हणजे DMK फुलस्टॉप, I म्हणजे इंडियन मुस्लिम लीग फुलस्टॉप, A म्हणजे आप आणि अन्य असलेले सगळे फुलस्टॉप. देशाच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग करणं या एवढं दुर्दैवं नाही”, असं उदय सामंत म्हणाले.
‘इंडियाची बैठक ही पर्यटनाची बैठक’
“या बैठकीला मी पर्यटनाची बैठक समजतो. सर्वजण मुंबई बघायला आलेले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी कसा विकास केलाय, तसा विकास आपल्या राज्यात करायचा आहे कदाचित हे बघण्यासाठी ते इकडे आले. ते कोस्टल हायवे बघून जातील. बाळासाहेब ठाकरे यांचं स्माराचं सुरु असलेलं काम बघून जातील. हा पर्यटनासाठीचा दौरा आहे. या पलिकडे यातून काही निष्पन्न होणार नाही”, असा दावा उदय सामंत यांनी केला.
उदय सामंत यांचा काँग्रेस नेत्यांना टोला
“काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत. राहुल गांधी यांच्यासमोर बाळासाहेब थोरात यांच्यापेक्षा आपली छाप चांगली आहे हे दाखवण्यासाठी अशोक चव्हाण यांना बोलावं लागेल. नाना पटोले यांच्यापेक्षा मी उजवा आहे, मी कुणाशीही चर्चा चर्चा केलेली नाही हे दाखवण्यासाठी अशोक चव्हाण यांना बोलावं लागेल. ज्यांचे नेते आज मुंबईत येत आहेत त्यांच्याजवळ मी किती आहे आणि मी काँग्रेस पक्षासाठी काय करतोय हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांना दाखवावं लागेल”, अशी टीका उदय सामंत यांनी केली.