तामिळनाडूच्या मंत्र्याची सनातन धर्मावर खोचक टीका, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. त्यांच्या या वक्तव्यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचे पुत्र आणि तामिळनाडू सराकरमधील मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. “आपण डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाला विरोध करु शकत नाही. आपल्याला या मच्छरांना संपवावंच लागतं. तसंच आपल्याला सनातनला संपवावं लागेल. सनातनला विरोध करण्यापेक्षा संपवलं पाहिजे”, असं धक्कादायक वक्तव्य उदयनिधी स्टालिन यांनी केलं होतं. त्यांच्यानंतर डीएमके खासदार ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना थेट HIV बरोबर केली. त्यामुळे हा वाद वाढलाय. या नेत्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
“स्टालिन हे हिंदूविरोधी आहेत. सनातन धर्म हा पौराणिक धर्म आहे. या धर्माला इतिहास आहे. असे स्टालिन धर्म कितीही आले तरी सनातन धर्म नष्ट करु शकत नाहीत. आता सगळे इंडिया आघाडीवाले एकत्र आले आहेत. ते हिंदुत्वादाच्या विरोधात आले आहेत. आता सगळ्यांचे चेहरे दिसत आहे”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
‘हिंदुत्वाचा मुखवटा पांघरुन…’
“दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर मनिशंकर अय्यरची जशी गत आहे तशी गत त्यांची झाली असती. पण दुर्देव आहे. त्यांचे चिरंजीव, माजी मुख्यमंत्री मुग गिळून गप्प बसलेले आहेत. हेच त्यांचं हिंदुत्व आहे. हिंदुत्वाचा मुखवटा पांघरुन हिंदुत्ववादी होता येत नाही. त्यामुळे हिंमत असेल तर मनिशंकरसारखी गत ह्यांनी स्टालिन आणि चिदंबरम यांची केली पाहिजे, अशी भावना सगळ्यांची आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“यांची निष्ठा या राज्यातील लोकांनी पाहिलीय. खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी निष्ठा विकणाऱ्या, बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्या लोकांनी निष्ठेचे धडे देऊ नये”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. एकनाथ शिंदे मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या दहीहंडीच्या कार्यक्रमांना भेट देत आहेत. या दरम्यान, त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे मराठा आरक्षणावर म्हणाले…
“मराठा आरक्षणाच्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. जे आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलं होतं. मी त्यांच्यासोबत होतो. त्या आरक्षणाला हायकोर्टाने मान्यता दिली होती. पण महाविकास आघाडीच्या काळात ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्यांच्या नाकार्तेपणामुळे ते झालं. आता ते राजकारण करत आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मराठा आरक्षणासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. सुप्रिम कोर्टाने जे मुद्दे काढले आहेत, त्यावर काम करुन मराठ समाज सामाजिक, शैक्षणिक पातळीवर मागास आहे ते सिद्ध करावं लागेल. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल”, असं एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं.