Mumbai Rain | दादर, भायखळा, ठाणे रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी, मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हलवली
मुंबई आणि उपनगरांतील रेल्वे स्थानकावर आज तुफान गर्दी जमलेली बघायला मिळत आहे. सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे स्थानकांवर प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई | 19 जुलै 2023 : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. मुंबईत दुपारनंतर मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कल्याण ते कसारा रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सध्या ही रेल्वे सेवा आता पूर्ववत सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच कल्याण रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याण ते डोंबिवली या दरम्यान अनेक रेल्वे गाड्या उभ्या होत्या. तसेच डोंबिवली ते मुंबई रेल्वेसेवा सुरु होती. तर अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक ठप्प झाली. या सगळ्यांचा फटका मुंबईतही बसला.
मुंबईत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी निर्माण झाली. फक्त सीएसएमटी स्थानक नाही तर भायखळा, दादर, ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी निर्माण झाली. संध्याकाळची वेळ ही चाकरमान्यांची घरी जायची वेळ असते. त्यामुळे साहजिकच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होते. पण रेल्वे वाहतुकीचा खोळंबा असल्याने जास्त गर्दी बघायला मिळाली. संबंधित परिस्थितीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यांनी लगेच सूत्रे हलवली.
मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
डोंबिवलीच्या पुढे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाल्यास एसटी बस जास्त सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच सीएसएमटी, भायखळा, दादर, ठाणे या रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी जादा बेस्ट बस गाड्या सोडण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आज पाऊस जास्त पडत असल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आज सुट्टी दिली. कर्मचाऱ्यांनी लवकर घरी पोहोचावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुट्टी दिली.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापक विभागाला भेट दिली. तिथे त्यांनी मुंबईसह राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली. यावेळी त्यांनी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्याचं जाहीर केलं. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या सचिवांनी सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्याची सूचना केली आहे.