‘जबाबदारीने वागा, यापुढे वादग्रस्त वक्तव्य नकोत’, मुख्यमंत्र्यांकडून अब्दुल सत्तार यांना समज

| Updated on: Nov 08, 2022 | 6:45 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची कानउघाडणी करण्यात आल्याची बातमी सूत्रांकडून मिळाली आहे.

जबाबदारीने वागा, यापुढे वादग्रस्त वक्तव्य नकोत, मुख्यमंत्र्यांकडून अब्दुल सत्तार यांना समज
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची कानउघाडणी करण्यात आल्याची बातमी सूत्रांकडून मिळाली आहे. माध्यमांसमोर बोलताना जबाबदारीने बोला, असं शिंदेंनी सत्तारांना सांगितलंय. जबाबदारीने वागा, जबाबदारीने काम करा, असा कानमंत्र शिंदेंनी अब्दुल सत्तारांना दिलाय. तसेच यापुढे वादग्रस्त वक्तव्य नकोत, असा सज्जड दमही मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांन दिलाय.

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवराळ भाषा वापरली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. विशेष म्हणजे फक्त कार्यकर्तेच नाहीत तर सर्वसामान्य जनताही अब्दुल सत्तारांच्या विधानावर नाराज होती.

सत्तारांच्या विधानाची राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. या प्रकरणावर रान पेटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सत्तारांची कानउघाडणी केली. तसेच सत्तारांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं तर त्यांचं मंत्रिपद धोक्यात येईल, असा इशारा त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना माध्यमांशी संवाद साधू नये. तसेच या प्रकरणी कुठेही भाष्य करु नये, अशी सूचनादेखील दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तसेच कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. अब्दुल सत्तारांचं आपण समर्थन करत नाही. तू चूकच आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडलीय.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही सत्तारांच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केलीय. “राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झालाय. सगळ्या पक्षांनी एकत्र बसून याची एक आचारसंहिता तयार करायला हवी. कसं वागायला पाहिजे याची आचारसंहिता तयार व्हायला हवी. कुणीतरी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे”, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडलीय.