सचिन वाझे म्हणजे लादेन नाही, दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवई करणार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

| Updated on: Mar 10, 2021 | 7:16 PM

मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. (cm uddhav thackeray addressing press conference)

सचिन वाझे म्हणजे लादेन नाही, दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवई करणार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई: मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे. (cm uddhav thackeray addressing press conference)

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. पूजा चव्हाण प्रकरण ते मनसुख हिरेन प्रकरणामुळे गाजलेल्या या अधिवेशनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अधिवेशन घेणं कोरोनात आव्हानात्मक होतं. पण नियम पाळून अधिवेशन घेतलं. विरोधकांनीही उत्तम सहकार्य केलं. परवा अर्थसंकल्प सादर केला. आव्हानात्मक स्थिती असतानाही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तरीही रडगाणं न गाता ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही’, हे आपलं ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार सर्व घटकांना आपण सामावून घेण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कुणालाही पाठी घालणार नाही

कोणत्याही मृत्यू प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणं हे सरकारचं काम आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असून त्यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. त्यात काही लोकांची नावं आहेत. त्याचाही तपास सुरू आहे. परंतु, आधी फाशी द्या मग तपास करा असं होत नाही. अशी पद्धत नसते. एखाद्याला टार्गेट करून त्याला आयुष्यातून उठवायंच अशी पद्धत सध्या सुरू आहे. परंतु, डेलकर किंवा हिरेन प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणारच. कुणालाही पाठी घालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

मग पोलीस यंत्रणा रद्द करा

हिरने यांच्या मृत्यूची गांभीर्याने दखल घेतली आहे. सचिन वाझे जणू ओसामा बिन लादेनच आहेत, असं चित्रं कशासाठी निर्माण केलं जात आहे. आम्ही कुणालाही दयामाया दाखवणार नाही. कोणईही असेल त्याला शिक्षा होणारच, असं सांगतानाच चौकशी करून फाशी द्या ही आपल्याकडची न्यायाची पद्धत आहे. फाशी देऊन न्याय करा अशी पद्धत नसते. त्यांनी जर पद्धत बदलली असेल तर त्यांनी सांगावं, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा असते. एखादा गुन्हा किंवा घटना किंवा दुर्घटना घडली असेल त्याबाबत शंका असेल तर आपल्याकडे अनेक यंत्रणा आहेत. जर यांच्या यंत्रणा भारी असतील तर पोलीस यंत्रणा रद्द करायची का?, असा सवाल त्यांनी केला.

त्याला अटक केली म्हणून वाझेंना अडकवताय का?

यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. अर्णव गोस्वामींना अटक केली म्हणून वाझेंना अडकवताय का?, असा सवालही त्यांनी केला.

वाझेंचा शिवसेनेशी संबंध नाही

वाझे पूर्वी शिवसेनेत होते. 2008 मध्ये ते सेनेत होते. त्यांनी पुन्हा सदस्यत्व घेतलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी काहीही थेट संबंध नाही. सर्व विषयात निष्पक्षपातीपणे पाहायचा चष्मा हवा. राज्य सरकारकडे जसं तारतम्य आहे, तसं विरोधकांनीही बाळगलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. (cm uddhav thackeray addressing press conference)

सीडीआर तपासयंत्रणेला द्या

सीडीआर कुणाकडे उपलब्ध होऊ शकतो का? त्यावर कारवाई करायची, नाही करायची या पेक्षा सीडीआर तपास यंत्रणेला द्या, त्यातील माहिती तपासू द्या. त्यावर पटकन भाष्य करणं योग्य नाही, असं ते म्हणाले. (cm uddhav thackeray addressing press conference)

 

संबंधित बातम्या:

Maha CM Uddhav Thackeray on Sachin Vaze | सचिन वाझे लादेन नाही, फाशी देऊन चौकशी नको, चौकशी करुन फाशी द्या : उद्धव ठाकरे

आठ दिवसांत सरकारचे घूमजाव; थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडणारच, नितीन राऊतांची माहिती

Maha CM Uddhav Thackeray on Sachin Vaze | सचिन वाझे लादेन नाही, फाशी देऊन चौकशी नको, चौकशी करुन फाशी द्या : उद्धव ठाकरे