महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर नि:पक्षपाती भूमिका घ्या; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

| Updated on: Jan 27, 2021 | 4:26 PM

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकारी समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीवर पार पडली. (cm uddhav thackeray reaction on maharashtra-karnataka dispute)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर नि:पक्षपाती भूमिका घ्या; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सीमावाद सुरू आहे. दोन राज्यांचा वाद न्यायालयात असेल, तर त्यामध्ये केंद्राने पालकाची आणि नि:पक्षपाती भूमिका घेणे अपेक्षित आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. (cm uddhav thackeray reaction on maharashtra-karnataka dispute)

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकारी समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीवर पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं. कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्व पक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहे, ते थांबवावे लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

परिस्थिती जैसे थे ठेवा

दोन राज्यांचा वाद न्यायालयात असेल, तर त्यामध्ये केंद्राने पालकाची आणि नि:पक्षपाती भूमिका घेणे अपेक्षित आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी माणसाला हद्दपार करत आहे. त्यामुळे या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करावा लागेल. हा मराठी भाग लवकरात लवकर महाराष्ट्रात यावा यासाठी सर्वानीच सर्व भेद, वाद विसरून एकत्र येऊन काम करावे लागेल. राज्यातील सर्व पक्षीयांनी एकजुटीने केंद्राकडे हा भाग मराठीच आणि महाराष्ट्राचाच असल्याचे आक्रमकपणे मांडावे लागेल. सीमा प्रश्नाचा न्यायालयातील पाठपुरावा सातत्यपूर्णरित्या व्हावा यासाठी सीमा प्रश्न कक्ष आणि विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

पाठपुराव्यासाठी मंत्री-वकिलांचा समन्वय

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी समन्वयक मंत्री आणि सीमा प्रश्न कक्ष यांनी वकील आणि विविध घटकांचा समन्वय करावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सीमा भागाचे समन्वयक मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महाधिवक्ता अॅड. आशुतोष कुंभकोणी, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधी विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड आदी उपस्थित होते. (cm uddhav thackeray reaction on maharashtra-karnataka dispute)

 

संबंधित बातम्या:

दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट: नवाब मलिक

सीमावादावर शेवटचं हत्यार कोणतं? शरद पवार म्हणाले…..

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित घोषित करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

(cm uddhav thackeray reaction on maharashtra-karnataka dispute)