आधी फडणवीस, आता शेलारांकडून राणेंच्या विधानापासून फारकत; शेलार म्हणाले, विमानतळाच्या उद्घाटनला मुख्यमंत्र्यांनी यावं
आम्ही राणेंच्या विधानाशी सहमत नाही, पण राणेंच्या पाठीशी आहोत, असं सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या विधानापासून फारकत घेतली होती. (ashish shelar)
मुंबई: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावण्याचं विधान केलं होतं. त्यावेळी आम्ही राणेंच्या विधानाशी सहमत नाही, पण राणेंच्या पाठीशी आहोत, असं सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या विधानापासून फारकत घेतली होती. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी राणेंच्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाशी संबंधित विधानावरून फारकत घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान राखला पाहिजे. त्यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलं पाहिजे, असं शेलार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहे. (cm uddhav thackeray should come chipi airport inauguration program, says ashish shelar)
आशिष शेलार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना राणेंच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यानी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी प्रोटोकॉल अधिकारी नाही. पण महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला असे वाटते की, भले शिवसेनेचा प्रयत्नामुळे चिपी विमानतळ झालं नसेल, भाजपच्या मुहूर्तमेढीमुळे झालं असेल तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांनी कार्यक्रमाला आलं पाहिजे असे माझे मत आहे, असं शेलार म्हणाले.
राऊत, शिवसेनाचा चिपी विमानतळाशी संबंध काय?
यावेळी त्यांनी विनायक राऊत आणि शिवसेना यांचा चिपी विमानतळ उभारणीशी संबंध काय?, असा सवालही केला. चिपी विमानतळाचं 1999 ला भूमिपूजन झालं तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार आणि पंतप्रधान होते. त्यावेळी ज्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला त्यात विनायक राऊत होते का? त्यांचा कोकण रेल्वेशी कधीच संबंध नव्हता. चिपी विमानतळाबाबतीत विनायक राऊत यांनी बोलघेवडेपणा करू नये. नारायण राणे आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये आहेत. भाजप या विषयाचा पाठपुरावा करते आहे. या प्रकल्पाची मुहूर्तमेढच भाजपने रोवली आहे. आणि ते होणार आहे म्हटल्यावर चालत्या गाडीमध्ये शिरण्याचा प्रकार विनायक राऊत आहेत. जर हे श्रेय तुमचे होते तर ते गेल्या 15 वर्षात का नाही झालं? भाजपचे प्रयत्न आणि राणेंचा पाठपुरावा यावर हा प्रकल्प उभा राहिला आहे याचा आम्हाला आनंद आहे, असं सांगतानाच विनायक राऊत यांनी उद्घाटनाची तारीख जाहीर करणे हे कुठल्या घुसखोरी कायद्यात बसते? अशा प्रकारामुळे मतं मिळत नाहीत, तर अप्रमाणिकता दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.
राणे काय म्हणाले?
नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाबाबतची तारीख जाहीर केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला येणार आहेत का? असा सवाल राणेंना करण्यात आला. त्यावेळी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे उद्घाटन करतील. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही, असं राणे म्हणाले होते.
राऊतांचा पलटवार
राणेंनी मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज नाही, असं विधान केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यावर पलटवार केला. कालच उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदें यांच्यात सकाळी 11 वाजता चर्चा झाली. यावेळी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, असं सांगतानाच काल 11 वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला 12 वाजता फोन करून सांगितलं की, आम्ही 9 तारीख फिक्स केली. मी त्यांना सांगितलं तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा, अशी माहिती राऊतांनी दिली.
दोनवेळा राणेंच्या वक्तव्यापासून फारकत
आधी देवेंद्र फडणवीस आणि आता आशिष शेलार यांनी राणेंच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मूळ भाजप नेत्यांचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना दुखावत नाहीत. शिवाय राजकारणात सर्वकाळ सारखी परिस्थिती राहत नाही. त्यामुळे कोणतीही वैयक्तिक कटुता निर्माण होऊ नये म्हणूनही भाजप नेत्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच ते राणेंच्या विधानापासून स्वत:ला बाजूला सारण्याचा प्रयत्न करताना दिसतात, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. (cm uddhav thackeray should come chipi airport inauguration program, says ashish shelar)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 September 2021https://t.co/XVgPM59JzW#100Superfastnews #superfastnews #marathinews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2021
संबंधित बातम्या:
बाप हा बापच असतो, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको; विनायक राऊतांनी नितेश राणेंना डिवचले
(cm uddhav thackeray should come chipi airport inauguration program, says ashish shelar)