मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनी नारायण भंडारी या काल्पनिक पात्रावरून एक किस्सा ऐकवून विरोधकांची भंबरी उडवली. त्यामुळे विरोधकांचा चांगलाच तिळपापड झाला आणि विधानसभेत एकच गोंधळ सुरू झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांचा कुणीतरी ऐकेरी उल्लेख केल्याने त्याला शिवसेनेने जोरदार आक्षेप घेताच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आसनावर उभं राहून सदस्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा पाडला. (cm uddhav thackeray slams bjp over various issues in maharashtra)
राज्यापालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत उभे राहिले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या एकएका मुद्दयाचा पर्दाफाश केला. यावेळी त्यांनी नारायण भंडारी या काल्पनिक पात्राचा किस्सा ऐकवला. ”कोविडचा उल्लेख करताना मला तुम्ही सांगितलेली माधव भंडारीची गोष्ट आठवली. (माधव नाही, नारायण… नारायण… सभागृहातून सदस्यांचा आवाज) माधव नाही… नारायण?… माधव तरी बरे होते…माधव की नारायण?… दोन्ही दिव्यच आहे… त्या नारायण भंडारीची कथा सांगितली. पण लहानपणीची सांगितली. पण नारायण मोठा होणार की नाही. त्याला मोठं करणार की नाही. एवढं शिवभोजन त्याला मोफत दिलं… खाऊन पिऊन तो मोठा होतो की नाही… मग काय झालं. नारायण भंडारी गाव सोडून जातो. ही कथा आहे हं… तुम्हाला ज्यांनी कथा दिली त्यानेच मला लिहून दिली. अनेक वर्षानंतर तो गावात येतो. गावात आल्यानंतर गुरुजींना भेटलं पाहिजे म्हणून जातो. गुरुजींच्या दारात मोठी गाडी उभी राहते. गाडी उतरतो. ओळखलंत का सर मला म्हणून विचारतो… गुरुजी म्हणतो तुला कोण नाही ओळखणार? तू तर नारायण भंडारी. तुला तर रोज टीव्हीवर बघतो. काय बोलतोस काय बोलतोस म्हणजे… अगदी गांजापासून पतंगाच्या मांज्यापर्यंत (एकच हशा) न्यूयॉर्कपासून ते आपल्या गावापर्यंत आणि जमिनीतील पाण्यापासून ते मंगळवारच्या पाण्यापर्यंत… कसं काय बुवा तुला जमतं. मी तर तुला शिकवलं नाही. तो म्हणाला, ते सोडून द्या हो. मला नवीन गुरू सापडला. ज्या क्षेत्रात मी आहे ना, तिथे असंच बोलावं लागतं. माहीत नसलं तरी बोलावं लागतं. तसं मी बोलतो. ते म्हणाले, वाह वाह वाह… बरं हे सांग आता कसं काय आलास? तो म्हणाला, आता काही नाही, मी सरकारच्या कोविड काळातील आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचारावरावर टीका करून आलो. गुरुजी म्हणाले… अरे काही तरी चांगलं केलंस. खूप चांगलं केलंस. आता आलाच आहेस तर जेवून जा… तो म्हणाला, मला परत प्रेस कॉन्फरन्स आहे… त्यावर गुरुजी म्हणाले, आता रे कसली प्रेस कॉन्फरन्स आहे… त्यावर तो म्हणतो, मघाशी हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार काढला. आता हॉस्पिटलमध्ये ज्यांनी लाच घेतली त्यांच्यावर कारवाई कराल तर याद राखा… आम्ही खंबीरपण त्यांच्या पाठीशी आहोत, हे सांगण्यासाठी प्रेस घ्यायची आहे…. असो असे नारायण भंडारी गावागावात असतात,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख
मुख्यमंत्र्यांनी नारायण भंडारीचा किस्सा ऐकवताच भाजप नेत्यांचा तिळपापड झाला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच विरोधकांनी गोंधळ घातला. जोरजोरात घोषणाबाजी केली. काही सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. वाढत्या गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांनाही आपलं भाषण थांबवावं लागलं.
अनिल परब संतापले
मुख्यमंत्र्यांचा सभागृहात एकेरी उल्लेख होताच मुख्यमंत्र्यांच्या पाठी बसलेले परिवहन मंत्री अनिल परब प्रचंड संतापले. अनिल परब तात्काळ आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख नको, विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या सदस्याला समज द्यावी, अशी जोरदार मागणी केली.
फडणवीसांची सारवासारव आणि दिलगिरी
मुख्यमंत्र्यांचा सभागृहात अवमान झाल्याचं लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लगेचच उभे राहिले आणि त्यांनी सारवासारव केली. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असले तरी मुख्यमंत्रीपद हे सन्मानीयपद आहे. त्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे. तसा उल्लेख झाला असेल तर मी स्वत: दिलगिरी व्यक्त करतो, असं सांगत फडणवीसांनी या वादावर पडदा पाडला. (cm uddhav thackeray slams bjp over various issues in maharashtra)
LIVE: महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/PriMbgv1GS
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 3, 2021
संबंधित बातम्या:
समता प्रतिष्ठान घोटाळ्याप्रकरणी अधिकारी निलंबित, उच्चस्तरीय चौकशीही होणार; मुंडें घोषणा
(cm uddhav thackeray slams bjp over various issues in maharashtra)