एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा
काँग्रसेने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेवर जोरदार हल्ला चढवला आहे. (CM Uddhav Thackeray)
मुंबई: काँग्रसेने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेवर जोरदार हल्ला चढवला आहे. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा अप्रत्यक्षपणे इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे. (CM Uddhav Thackeray slams congress over declared to contest upcoming election alone)
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधतानाच काँग्रेसलाही स्वबळाच्या नाऱ्यावरून टार्गेट केलं. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. स्वबळाचा नारा काय देता? माझ्या रोजी रोटीचं काय? तू पुढे चालला माझं काय? असं लोक म्हणतील, असंही ते म्हणाले.
तर देश अराजकतेकडे जाईल
निवडणुका एके निवडणुका आणि सत्ता प्राप्ती या सर्व गोष्टी बाजूला ठेवून पुढे येणाऱ्या आर्थिक संकटाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. ते न करता विकृत राजकारण केलं तर देश अराजकतेकडे जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कुणाचीही पालखी वाहणार नाही
आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे. आम्ही भलत्यासलत्याच्या पालख्यांना खांदा देणार नाही. त्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही. पायात फाटके जोडे घालू, पण आम्ही आमच्याच पायांवर खंबीरपणे उभे राहू, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
स्वबळाचा नारा आपणही देऊ
अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला. मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा. माझ्यासाठी स्वबळ हे आहे. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं. पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक आहे, असं ते म्हणाले
आघाडी किती दिवस टिकणार…
देशाभिमान पहिला, आमचं हिंदुत्व संकुचित नाही. शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का असं विचारलं जातं. हिंदुत्व हे नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, श्वास आहे. त्यामुळे गैरसमज करु नका, युती तोडली, आघाडी केली, किती टिकणार वगैरे, त्याची काळजी करु नका. आमचा हेतू प्रामाणिक आहे. राज्याचा विकास करणे, गोरगरिबांची आशीर्वाद मिळवणं. त्यासाठी काही करत असू तर हे सोडलं आणि ते धरलं असा त्याचा अर्थ होत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
गाव कोरोनामुक्त करा
राजकारण बाजूला ठेवा, आपल्या वर्धापन दिनी कार्यक्रम देतोय, गाव कोरोनामुक्त करा. हा कार्यक्रम आम्ही देतोय. असा कोणता पक्ष आहे का वर्धापन दिनी राजकारण बाजूला ठेवा असं सांगतोय. गाव कोरोना मुक्त करण्याचा, घर कोरोनामुक्त करण्याचा नारा देणारा कोणता पक्ष आहे का? असा सवालही त्यांनी केला. (CM Uddhav Thackeray slams congress over declared to contest upcoming election alone)
Uddhav Thackeray Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह https://t.co/t6RoCQU20X
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 19, 2021
संबंधित बातम्या:
स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य
भाजप सत्तेसाठी कासावीस, सत्तेची पोटदुखी झालेल्यांना राजकीय औषध देणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात
(CM Uddhav Thackeray slams congress over declared to contest upcoming election alone)