CM Uddhav Thackeray: राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार, तारीख लवकरच जाहीर करणार
CM Uddhav Thackeray: अयोध्या दौरा करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची मुंबईत मोठी सभा होणार आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे अयोध्येचा दौरा करणार आहे. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून (shivsena) याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरे सुद्धा अयोध्येला जाणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही अयोध्येला जाणार आहेत. राज ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्ववादी असल्याची प्रतिमा तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेननेही आपणही हिंदुत्वादी असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.
अयोध्या दौरा करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची मुंबईत मोठी सभा होणार आहे. येत्या 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसी येथे सभा होणार आहे. तर 8 जून रोजी मराठवाड्यात सभा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठवाडा मजबूत करा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादेत सभा होत आहे. औरंगाबाद महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे शिवसेनेनेही आता मराठवाडा आणि विदर्भावर आपलं लक्ष्य केंद्रीत केलं आहे. मराठवाड्यातील हिंदुत्ववादी व्होटबँक आपल्याकडेच कायम राहावी म्हणून शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांसोबत बैठक केली. या बैठकीत त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे औरंगाबाद पालिका राखण्यात शिवसेना यशस्वी ठरते की मनसे शिवसेनेचे मनसुबे उधळून लावते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे लक्ष्य
राज ठाकरे हे जूनमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.