कागदपत्रांची चिंता करू नका, सर्वांना मदत करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात, दरड दुर्घटनेची पाहणी

| Updated on: Jul 24, 2021 | 3:15 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी अडीचच्या सुमारास तळीये गावात पोहोचले. मुख्यमंत्री मुंबईवरुन हेलिकॉप्टरने महाडपर्यंत आणि तिथून रस्तेमार्गे तळीये गावात पोहोचले.

कागदपत्रांची चिंता करू नका, सर्वांना मदत करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात, दरड दुर्घटनेची पाहणी
CM Uddhav Thackeray at Taliye Raigad
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी अडीचच्या सुमारास तळीये गावात पोहोचले. मुख्यमंत्री मुंबईवरुन हेलिकॉप्टरने महाडपर्यंत आणि तिथून रस्तेमार्गे तळीये गावात पोहोचले. तळीये गावात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्यांनी तळीये गावात दरड दुर्घटनेची पाहणी केली.

तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.

कागदपत्रांची चिंता करू नका

या दुर्घटनेत ज्यांचं नुकसान झालं आहे. त्यांचं सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व मदत करू. फक्त तुम्ही स्वत:ला सावरा, असंही त्यांनी सांगितलं.

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खं गावच नेस्तानाबूत झाले असून त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करत आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत कोण कोण तळीये गावात उपस्थित?  

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
  • राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे
  • रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे
  • रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी
  • नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
  • परिवहन मंत्री अनिल परब
  • शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर

VIDEO : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत झाले. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना झाले.  तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करत आहेत. दुपारी 3.20 वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करतील. त्यानंतर प्रशासानाकडून घटनेची माहिती घेतील, असं सूत्रांनी सांगितलं.

तळीयेत काय घडलं?

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत. (cm uddhav thackeray will reach at taliye at mahad)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Rain Landslides LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दुर्घटनाग्रस्त गावाचा पाहणी दौरा, 12 वाजता विमानाने रवाना होणार

VIDEO : “आई-वडील, भाऊ, भावजय, भावाचं अख्खं कुटुंब गेलं, माहेरचं स्मशान झालं”

Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 38 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना

(cm uddhav thackeray will reach at taliye at mahad)