VIDEO : साहेबच अध्यक्षपदी राहावेत, सुप्रिया सुळे यांच्याकडे सफाई कामगाराची मागणी; व्हिडीओ तुफ्फान व्हायरल
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा सामान्य लोकांनाही पटलेला नाही. एका सफाई कामगारानेही पवारच अध्यक्ष असावेत अशी इच्छा बोलून दाखवली आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याची पक्षातील बड्या नेत्यांनाही कल्पना नव्हती. पवारांनी जेव्हा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे असं सांगताच सर्वांच्याच पोटात गोळा आला. अनेकांना तर रडू कोसळले. काही कार्यकर्त्यांनी तर सभागृहातच ठिय्या आंदोलन करत शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची गळ घातली. राष्ट्रवादीच नव्हे तर इतर राजकीय पक्षांनाही शरद पवारांचा हा निर्णय अनपेक्षित होता. सर्व सामान्य लोकांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. एका सफाई कामगाराने तर शरद पवारच अध्यक्ष राहावेत अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.
सुप्रिया सुळे नेहमी प्रमाणे आज मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. यावेळी एका सफाई कामगाराने त्यांच्याशी संवाद साधला. ताई, कालची पवार साहेबांची बातमी बघितली. त्यांनी राजीनामा दिला. पवार साहेब यांचे विचार शाहू, फुले, आंबेडकरांचे आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पुन्हा स्वीकारावं. मी सामान्य नागरिक आहे. पण मलाही वाटतं शरद पवार साहेबच अध्यक्ष राहावेत, असं हा सफाई कामगार म्हणाला. या सफाई कामगाराची भावना ऐकून सुप्रिया सुळे यांनाही काही क्षण भरून आलं.
सेल्फी घेतला
संदेश पवार असं या सफाई कामगाराचं नाव आहे. तो महालक्ष्मीच्या रेसकोर्स येथे राहतो. हा सफाई कामगार मूळचा राजापूरचा आहे. 1 मिनिट 27 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडीओ त्यांच्या फेसबुकवर शेअर केला असून त्याला तुफान लाइक्स मिळत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी या सफाई कामगाराशी संवाद साधला. त्याच्यासोबत सेल्फी घेतला. तुम्ही सफाई करता त्यामुळे मुंबई स्वच्छ राहते. तुम्ही पवार साहेबांसाठी प्रेम दाखवलं त्याबद्दल आभार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कर्नाटक दौरा रद्द
सुप्रिया सुळे यांनी आज आपण कर्नाटकात निवडणूक प्रचारासाठी जाणार असल्याचं या व्हिडीओत सांगितलं. निपाणी येथे ही प्रचार सभा होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड घडामोडी घडत आहेत. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा आजचा कर्नाटक दौरा रद्द झाला आहे. त्याही चव्हाण सेंटरमधील बैठकीला जाणार आहेत.