देवस्थानाच्या जमिनी हडपल्या, भाजपच्या सुरेश धस यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; नवाब मलिकांचे आरोप काय?
आष्टीत मंदिर आणि मशिदीच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार दोंदे यांच्याविरोधात राम खाडे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे.
मुंबई: आष्टीत मंदिर आणि मशिदीच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार दोंदे यांच्याविरोधात राम खाडे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, जो भाजप प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन राजकारण करत आहे. त्याच भाजपचे नेते राज्यात प्रभू रामांच्या मंदिराच्या जमिनी हडपत आहे, असा घणाघाती हल्लाही मलिक यांनी केला.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला. तसेच या घोटाळ्यावरून भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. सात देवस्थानाच्या बाबतीत राम खाडे यांनी तक्रार केली आहे. गृहखाते, महसूल खाते आणि ईडीकडेही या दहा प्रकारणाची तक्रार केली आहे. त्यात मच्छिंद्रनाथ मल्टि इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचाही सहभाग आहे. या सर्व जागा खालसा करत असताना या कोऑपरेटीव्हच्या माध्यमातून जे बगलबच्चे तयार करण्यात आले त्यांच्या खात्यात पैसे गेले. त्यातून खरेदी खत करण्यात आले. तिथल्या दोन नेत्यांचे नाव ईडीच्या तक्रारीत आहेत. त्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांचं नाव आहे. त्याचबरोबर आष्टीचे माजी आमदार दोंदे यांच्या नावानेही तक्रार झाली आहे, असं मलिक यांनी सांगितलं.
सात प्रकरणाची एसआयटी चौकशी करा
जो भाजप रामाच्या नावने राजकारण करतो त्या भाजपचे नेते प्रभू रामाच्या देवस्थानाची जागा हडपत आहेत. विठोबाची जागा हडपत आहे. सात देवस्थानाची जागा हडप करून हजारो कोटी रुपयांची माया जमा करत आहेत. भाजपच्या माध्यमातून हे होत आहे. ईडी सारख्या संस्थेवर कोणीही अविश्वास दाखवत नाही. या दहा देवस्थानांपैकी तीन मुस्लिम आणि सात हिंदू देवस्थानांमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला. वक्फच्या जमिनीचा तपास सुरू आहे. इतर सात प्रकरण एसआयटीकडे सोपवण्याची विनंती गृहखात्याला करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
कितीही मोठा माणूस असो कारवाई करा
कोणतंही देवस्थान असो, राज्यात देवस्थानच्या जमिनी हडपण्याचं काम सुरू आहे. त्याची पोलखोल आम्ही सुरू केली आहे. वक्फ बोर्डाकडे तक्रारी मिळत आहेत. कागद तपासा, कितीही मोठा माणूस असेल त्यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश वक्फ बोर्डाला दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
11 एफआयआर दाखल
जमीन घोटाळ्याप्रकरणी आम्ही आतापर्यंत 11 एफआयआर दाखल केले आहेत. नांदेड, पैठण, जिंतूर रोड, परभणी, जालना, पुणे, औरंगाबाद, आष्टीतील देवस्थानांच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आष्टीत तर मशीद आणि दर्ग्याच्या जमिनी हडप केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. आष्टीत अधिकाऱ्यांनी सर्व्हिस इनाम जमिनीला मदत इनाम दाखवून हडप केली. खासगी नाव टाकून त्याचं प्लॉटिंग करून विकण्याचा त्यांचा डाव होता. आम्ही तक्रार दाखल केली आहे. आष्टीत दहा देव अस्थानाचा घोटाळा उघड केला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कोणत्या जमिनी हडपल्या?
वक्फ बोर्डाच्या 213 एकर जमिनी आहेत. त्यात मशीद इनाम 60 एकर, रुई नलकोल 103 एकर, नवीन निमगाव मशीद ईनाम 50 एकर आणि मशीद आणि दर्गा इनाम अशा 213 एकर जमिनी आहेत. मंदिरांच्या जमिनीही बळकावण्याचं काम आष्टीत झालं आहे. मुर्शीद पूर विठोबा देवस्थान 41 एकर 32 गुंठे, पांढरी तालु आष्टी खंडोबा देवस्थान 35 एकर, श्रीराम देवस्थान, कोयला तालुका आष्टी 29 एकर, चिखली हिंगणी कोयाड श्रीरामदेवस्थान 15 एकर, चिंचपूर रामचंद्र देवस्थान 65 एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान 60 एकर आणि खडकत विठोबा देवस्थान 50 एकर अशा एकंदरीत 300 एकर जमीन हिंदू देवांची सर्व्हिस इनाम जमीन अधिकाऱ्यांच्या संगनमताने खालसा करण्यात आली आहे.
एकंदरीत 513 एकर जमीन मशीद, मंदिर यांची मालकी कधीही बदलता येत नाही. 2017पासून हा प्रकार सुरू आहे. त्याकाळात डेप्युटी कलेक्टर एनआर शेळके यांनी या जमिनी खालसा करण्याचा उद्योग सुरू केला. त्यावर विधानसभेत प्रश्न विचारला. नंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. नंतर प्रकाश अगाव नावाचे डेप्युटी कलेक्टर आले. 2017पासून 2020 पर्यंत जमीनी हडपण्यात आल्या आहेत. एफआयआर दाखल असताना गृहमंत्र्यांकडे तक्रार झाली. त्यांनी एसआयटीची नेमणूक केली आहे. त्यांनी दोन गुन्ह्यांचा तपास सुरू केला. मी गृहमंत्र्याला पत्रं दिलं. चिंचपूरच्या जागेचा उल्लेख नाही. त्याचा तपासही एसआयटीकडे द्या, अशी विनंती मी गृहखात्याला केली आहे. देवी निमगावचाही तपास होणार आहे. त्यातून सत्यबाहेर येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद https://t.co/8mkx7fSSYf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 21, 2021
संबंधित बातम्या:
Omicron Alert: औरंगाबादेत होम क्वारंटाइन बंद! मोठे उत्सव, लग्न टाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
Cotton crop: फरदड कापसाला एक ना अनेक पर्याय? पीक पध्दतीमधील बदलच फायद्याचा, वाचा सविस्तर