मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करणं काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या अंगलट येणार असल्याचं दिसत आहे. सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करा, अशा सूचनाच काँग्रेस हायकमांडने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सत्यजित तांबे यांना कोणत्याही क्षणी निलंबित करण्यात येणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान, कालच सत्यजित तांबे यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे तांबे पितापुत्रांना मोठा झटका बसला आहे.
काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दिला होता. पण सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याविषयी आधीच सूचक विधान केलं होतं. त्यानंतर या राजकीय घडामोडी घडल्याने एकच खळबळ उडाली होती.
सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्याने त्याची काँग्रेसने गंभीरपणे दखल घेतली असून सुधीर तांबे यांना कालच पक्षातून निलंबित केलं आहे. तर, सत्यजित तांबे यांनाही पक्षातून निलंबित करा, असे आदेशच दिल्लीतून हायकमांडने राज्य काँग्रेसला दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राज्य काँग्रेस कोणत्याही क्षणी सत्यजित तांबे यांची पक्षातून निलंबित करण्याची शक्यता आहे.
सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करण्याच्या सूचना हायकमांडने दिल्याचं वृत्त आल्यानंतर सत्यजित तांबे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, या सर्व राजकीय घडामोडींवर सत्यजित तांबे येत्या 18 आणि 19 जानेवारी रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे सत्यजित तांबे काय गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघा अर्धा तास बाकी आहे. असं असतानाच महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल आहेत. शुभांगी पाटील या कालपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांची कार जालना जिल्ह्यातील अंबड येथे सापडली आहे. पण पाटील या नॉट रिचेबल असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.