मुंबई: भाजप नेते अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आमच्यावर टीका केली. अलिकडे भाजपचे सर्वच नेते कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत. अमित शहा यांनीही मनोबल खचलेल्या भाजप कार्यकर्त्यांना सावरण्याचा प्रयत्न केलाय, असा टोला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत हा टोला लगावला आहे. अलिकडे भाजपचे सर्व नेते त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत. त्यामुळेच चंद्रकांत पाटील भाजप 45 वर्ष सत्तेत राहील असं सांगत आहेत. देवेंद्र फडणवीसही ज्याला राजकारण कळतं ते भाजपमध्ये राहतील असं म्हणत आहेत. राज्यात भाजपची अधोगती सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल संपलेले आहे, नैराश्य आले आहे. भाजप कार्यकर्त्यांना नैराश्यातून सावरण्याचा हा प्रयत्न आहे, असं सांगतानाच आमचे सरकार चांगले काम करतंय. पुढील निवडणुकीतही भाजपला दूर ठेवण्याचं काम आम्ही करणार आहोत, असं थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी सहकार चळवळीवरही भाष्य केलं. सहकार हा विषय राज्यात चांगल्या पद्धतीने राबवला आहे. राज्यात समृद्धी दिसतेय. त्यात सहकाराचा वाटा आहे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी राज्याला लवकरच विधानसभा अध्यक्ष मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. या अधिवेशनात काँग्रेसला नवा विधानसभा अध्यक्ष मिळेल आणि तो काँग्रेसचाच असेल. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींशी चर्चा करून नाव ठरवलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एसटी संपावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. परिवहन मंत्री अनिल परब या विषयावर चांगलं काम करत आहे. ते आमच्याशी आणि मुख्यमंत्र्यांशी बोलत असतात. एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नाही हे दिसतंय. तो विषयही कोर्टात आहे. कर्मचार्यांनी संप मागे घ्यावा आणि कामावर यावं, असं आवाहन त्यांनी केलं.
भाजप नेते अमित शहा काल पुण्यात होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुणे महापालिकेत लक्ष्य कमी ठेवू नका. कोणी म्हणतं शंभर जागा जिंकू तर कोणी म्हणतं 110 जागा जिंकू. तुम्ही लक्ष्य कमी ठेवू नका. जनता खूप द्यायला तयार आहे. तुम्ही मागताना कंजुषी करू नका, असं शहा यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.
राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटोरिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर झालेले आहेत. ते चालत नाही. फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं, अशी टीका करतानाच महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा. हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? असा सवाल करा. देशाचं नेतृत्व या महाराष्ट्राने केलं. सर्व गोष्टीत महाराष्ट्र आघाडीवर होता. कृषीपासून ते सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर होता. हे लोक महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ शकते का? हे निकम्म सरकार आहे. या सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालाने झाली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
संबंधित बातम्या:
हिंमत असेल तर राजीनामा देऊन मैदानात या, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना ललकारले
पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अमित शाहांची पुणेकरांना ग्वाही