‘मी खपवून घेणार नाही’, नाना पटोले संतापले, नेमकं कुणावर भडकले?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर अतिशय खोचक शब्दांत टीका केली. त्यांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत आक्रमक पद्धतीत आपली भूमिका मांडली. त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. महाराष्ट्र कोल्हापूर आणि मुंबईच्या चर्चगेट येथे घडलेल्या दोन घटनांमुळे सुन्न झाला आहे. या दोन घटनांवरुन नाना पटोले यांनी सरकारवर अतिशय कडक शब्दांत ताशेरे ओढले आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. आपल्याला सरकार चालवता येत नसेल तर पायउतार व्हा, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
“महाराष्ट्रातील तथाकथिक काही संघटना अशी काही घटना घडली की पुन्हा आग टाकण्याचा प्रयत्न करतात. संबंधित घटनेत तेल, पेट्रोल ओतण्यात काम केलं जातं. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मी खपवून घेणार नाही. कोणाचं खपवून घेणार नाही? राज्यात ज्या सातत्याने धार्मिक आणि जातीय तणाव घडत आहेत ते थांबण्याची जबाबदारी सरकारची आहे”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी सुनावलं.
‘सरकार महाराष्ट्राची बदनामी करायला निघालं आहे का?’
“सरकार हे मुद्दाम करतंय काय? या सरकारला काय अपेक्षित आहे? सुप्रीम कोर्टाने या सरकारला नपुंसक म्हटलं आहे. महाराष्ट्रातील नपुंसक सरकार जातीय तेढ आणि धार्मिक तेढ निर्माण करुन शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राची बदनामी करायला निघालं आहे का? हा सवाल आम्ही काँग्रेसच्या वतीने करतोय”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी घणाघात केला.
‘…तर तातडीने पायउतार व्हा’
“तुम्हाला सरकार चालवता येत नसेल. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळता येत नसेल, तर या सरकारने तातडीने पायउतार व्हावं, या पद्धतीची महाराष्ट्राची बदनामी आम्ही कधीही खपवून घेणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे”, असं नाना पटोले आक्रमकपणे म्हणाले.
“या महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करुन सरकार बदनामी करण्याचा प्रयत्न कुणीतरी करतंय. सरकारला आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना आम्ही जावून सांगितलं, तरीही सरकार मुद्दाम या पद्धतीच्या घटना घडवत असेल, काही तथागथित काही संघटना राज्यात मुद्दामून विष ओकण्याचं काम करत असेल तर कधीही खपवून घेणार नाही”, असं नाना पटोले म्हणाले.
‘महाराष्ट्रात मुली, महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत’
“सरकारच्याच जवळ, हाकेवर चर्नीरोडला सावित्रीबाई फुले वसतिगृहात जावून मुलीवर बलात्कार घडणं, नंतर आरोपीने आत्महत्या करणं, या महाराष्ट्रात हे काय चाललं आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला उत्तर द्यावं लागेल”, असं नाना पटोले म्हणाले.
“या महाराष्ट्रात मुली, महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. जातीय तेढ निर्माण करुन तुम्ही महाराष्ट्र बदनाम करत आहात. याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावंच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्याच राज्यात मुली संरक्षित नसतील, तर तुम्हाला राज्यकर्ते म्हणून दिमाखदारपणे वावरता येणार नाही. या घटनेची दखल तुम्ही घेतली पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राची जनता तुम्हाला फिरू देणार नाही”, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.